
Nagpur MLC Election: जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून (Old Pension Scheme) अमरावती पदवीधर तर नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीत (Nagpur MLC Election) नोकरदार मतदारांनी भाजपला (BJP) धूळ चारत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या बाजूने कौल दिला.
मतमोजणीला उशीर लागणार असला तरी एकंदरीत कल पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात असून आघाडीच्या उमेदवारांनी त्यानुसार जल्लोषही सुरू केला आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्व जिल्ह्यातच भाजपला पराभव पहावा लागल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
नागपूर शिक्षक मतदार संघात भाजपकडून दुसऱ्यांदा ना. गो. गाणार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विजयाचे दावेदेखील केले जात होते. परंतु त्यांच्याकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेबाबत कोणतेच मत गेल्या काही वर्षात मांडले गेले नाही. याच उदासीनतेचा फटका गाणार यांना बसल्याचे सांगितले जाते.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी तब्बल १४०७१ मतांची आघाडी घेतली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे ना. गो. गाणार यांना पहिल्या फेरीत अवघी ६३०९ मते होती.
७७०३ मतांची आघाडी अडबाले यांनी घेतली. या निवडणुकीत ३४ हजार मते असून त्यातील २८ हजार मतांची मोजणी झाली होती. परिणामी अडबाले यांचा विजय निश्चित असून केवळ औपचारिक घोषणा होणेच शिल्लक होते.
त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशे लावत जल्लेषाला सुरुवात करण्यात आली. ओबीसी महासंघाचे बबनराव तायडे यांच्या घरी सुधाकर अडबाले यांनी परिवारासह उपस्थिती लावली. यावेळी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार व इतर उपस्थित होते.
अमरावतीत रजणीत पाटलांचा पराभव
अमरावती पदवीधरमध्येदेखील भाजपला मतदारांनी नाकारले. उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय डॉ. रणजीत पाटील यांना दुसऱ्यांदा पदवीधरमध्ये संधी देण्यात आली होती.
परंतु जनसंपर्काचा अभाव, कोणत्याच विकासात्मक कामाची नोंद नसल्याने डॉ. पाटील यांचा पराभव झाल्याचे सांगितले जाते.
डॉ. पाटील कोणातच मिसळत नव्हते, केवळ निवडणुकीच्या काळातच ते सामान्यांच्या दृष्टिक्षेपात येत असत, उर्वरित काळात ते अज्ञातवासात राहत असल्याने त्यांना जनतेने नाकारल्याची चर्चा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.