बोंडअळीचे अनुदान ३० जूनपर्यंत द्या

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
बोंडअळीचे अनुदान ३० जूनपर्यंत द्या
CottonAgrowon

कासोदा, जि. जळगाव : एरंडोल, पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कपात झालेले बोंड अळीचे (Boll worm) ३३ टक्के अनुदान (Subsidy) मिळावे, यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देत ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांचे उर्वरित ३३ टक्के अनुदान देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना ११ कोटी ७० लाख १४ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

खरीप हंगाम २०१६-२०१७ मध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्यात गुलाबी बोंड अळीचे शंभर टक्के अनुदान वितरण करण्यात आले होते; परंतु जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान ३३ टक्के कपात करून देण्यात आले होते. त्यामुळे शासनाने ३३ टक्के व त्यावरील नुकसानीस पात्र धरून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानभरपाई देण्याचे ठरविले. परंतु कृषी अधिकारी व महसूल अधिकारी यांच्या शासन निर्णयातील तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून शेतकऱ्यांचे ३३ टक्के क्षेत्रावरील ३३ टक्के अनुदान शेतकऱ्यांना न देता परत पाठविले. त्यामुळे आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पवार, भगवान चौधरी, संतोष पाटील, उत्तम पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात २०१९ मध्ये रिट याचिका दाखल केली होती.

दरम्यान, शासनातर्फे शपथपत्र दाखल करून झालेली चूक कबूल करून उर्वरित बाधित शेतकऱ्यांना निधीवाटपासाठी शासनाकडे मागणी केली आहे. तो निधी प्राप्त होताच वितरित केला जाईल, असे शपथपत्र दाखल केल्याने उच्च न्यायालयाने ही याचिका १६ डिसेंबर २०१९ ला निकाली काढली; परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटूनही शासनाने निधी दिला नाही. त्यामुळे शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्याने याचिका दाखल करून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. शांताराम पवार आदींतर्फे विधिज्ञ म्हणून ॲड. श्‍वेता कुलकर्णी, ॲड. डी. के. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

शेतकऱ्यांना मिळणार ११ कोटी ७० लाख रुपये
औरंगाबाद खंडपीठाने ८ जूनला राज्य शासनाला ३० जूनपर्यंत ११ कोटी ७० लाख १४ हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करावेत, अन्यथा मदत व पुनर्वसन सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी २ जुलैला व्यक्तिशः उच्च न्यायालयात हजर राहावे, असे आदेश दिले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com