
Jalgaon River Bridge News : जिल्ह्यात बहुप्रतीक्षीत व चर्चेत राहिलेल्या तापी नदीवरील (Tapi River) भोकर (ता.जळगाव) व खेडीभोकरी (ता.चोपडा) या दरम्यान पुलाच्या (Bridge) मागणीची शासनाने दखल घेतली असून, येत्या गुरुवारी (ता.१६) पुलाच्या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती आहे.
तापी नदीकाठी भोकर व खेडीभोकरी ही गावे आहेत. परंतु या दोन्ही गावांसह लगतच्या भागातील शेतकरी, ग्रामस्थांना जळगाव किंवा चोपडा जाण्यासाठी मोठा फेरा पार करावा लागायचा.
पुलाअभावी या भागातील केळी, कापूस, फळ शेतीलाही चालना हवी तशी मिळत नव्हती. जळगाव तालुक्यातील भोकरसह किनोद, गाढोदे, कठोरा, भादली खुर्द, आमोदे, जामोद, पळसोद या गावांमधील शेतकरी, ग्रामस्थांना चोपडा येथे जाण्यासाठी सुमारे २० ते २२ किलोमीटर एवढ्या अंतराचा फेरा पार करावा लागायचा.
एवढाच फेरा चोपडा तालुक्यातील खेडीभोकरी, गोरगावले खुर्द, गोरगावले बुद्रूक, धनवाडी, गरताड, कोळंबा, खडगाव, घुमावल-तावसे आदी गावांमधील ग्रामस्थांना जळगाव येथे येण्यासाठी पार करावा लागत होता.
जळगाव तालुक्यातील किनोद, कठोरा, फुपणी, भादली खुर्द, भोकर, गाढोदे, पळसोद, जामोद या गावांमधील शेतकरी, ग्रामस्थांना जळगावपेक्षा चोपडा नजीक आहे.
यामुळे या गावांमधील शेतकरी, ग्रामस्थांचा बाजार, खरेदी किंवा अन्य कामासंबंधी चोपड्याशी अधिक संपर्क आहे. परंतु तापी नदीवर पूल नसल्याने अडचणी येत होत्या. खेडीभोकरी व भोकर दरम्यान दरवर्षी जानेवारीत एक अस्थायी कच्चा पूल उभारला जातो.
पण हा पूल जूनमध्ये बंद केला जातो. पावसाळ्यात चोपडा येथे भोकर भागातून जाण्यासाठी व खेडीभोकरी भागातून जळगावात किंवा जळगाव तालुक्यातील गावांत येण्यासाठी होडीचा वापर करून तापी नदी पार करावी लागते. हा प्रवास धोकादायक आहे.
कारण तापी नदीला जूनच्या मध्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत पाण्याचा मोठा प्रवाह असतो. जानेवारीत नदीमधील पाण्याचा प्रवाह कमी होतो.
होडीतून प्रवासासाठी प्रतिप्रवासी २० रुपये व दुचाकीसाठी २० रुपये, असे भाडे द्यावे लागते. नदी पार करण्यासाठी येताना व जाताना तब्बल ८० रुपये एका प्रवाशाला पावसाळ्यात खर्च करावे लागतात. अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे.
खेडीभोकरी व लगत केळी, कापूस, पपई पिकाची शेती अधिक आहे. तसेच भोकर भागातही केळी, कापूस, फळ पिके, पपईची शेती अधिक आहे. पुलाअभावी वाहतूक खर्चही अधिक येतो. यामुळे तापी नदीवर पुलाची मागणी अनेक वर्षे शेतकरी, ग्रामस्थ करीत होते.
१५० कोटी निधी लागणार...
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल शासनाने घेऊन नदीवर पूल उभारण्याच्या हालचाली पाच ते सहा वर्षांपासून सुरू केल्या होत्या. आघाडी सरकारने पुलास मंजुरी दिली.
सुमारे १५० कोटी रुपये खर्च या पुलास लागणार आहे. त्याचे भूमीपूजन येत्या गुरुवारी (ता.१६) मुख्यमंत्री व इतर लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती आहे. पुलाचे काम लवकर पूर्ण करून शेतकरी, ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्याचा मुद्दा यानिमित्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.