
Cotton Farming जळगाव ः ‘‘शासनाने जनुकिय सुधारित व तणनाशक सहनशील कापूस बीटी वाणांच्या (BT Cotton) प्रसाराबाबत घाईने निर्णय घेऊ नये. सर्व कसोट्यांवर तपासणी, संशोधन (Cotton Research) शासनाच्या प्रयोगशाळा, प्रक्षेत्रात व्हायला हवे.
कुणी कंपनी सांगते यासाठी कापसातील नवे बियाणे (Cotton Seed) आणणे योग्य नाही’’, असे परखड मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे (Dr. Vyankatv Mayande) यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केले.
जळगाव शहरानजीक जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय कांदा व लसूण चर्चासत्र कार्यक्रमानिमित्त डॉ. मायंदे आले होते. या वेळी त्यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला.
डॉ. मायंदे म्हणाले, ‘‘ कापसासंबंधी उत्पादकतेत घसरण व इतर समस्या आल्या आहेत. नैसर्गिक समस्यांसह गुलाबी बोंड अळीचा प्रकोप यामुळे उत्पादकता घटत आहे.
परंतु कापसाच्या बोलगार्ड (बीटी) आवृत्तीमधील विकास, जनुकिय सुधारित वाणांसह तणनाशक सहनशील वाणांची मागणीही पुढे येत आहे. या संशोधनामुळे पुढेही गुलाबी बोंड अळी येणार नाही, याची खात्री देता येणार नाही.
तणांची समस्या आहे, यासाठी तणनाशक सहनशील कापसाचा बीटी वाण आणावा, हा उपाय नाही. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हित हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
कापूस बियाण्यातील जनुकिय सुधारित वाण, बोलगार्डमधील तिसरी किंवा इतर नवी आवृत्ती आणण्यासंबंधी शासनाने आपल्या प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांची मदत घेऊन त्याबाबत संशोधन करावे. ते किती उपयोगाचे आहे, हे लक्षात घ्यावे.’’
‘‘सध्या जे बोलगार्ड तंत्रज्ञान कापूस पिकाच्या वाणांबाबत बाजारात आहे. त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे, हे निश्चित. कापूस बियाण्याच्या वाणांची गुणवत्ता महत्त्वाची आहे. कुणी कंपनी सांगते म्हणून आपल्या शेतकऱ्यांसाठी कुठलेही वाण आणणे गैर आहे,’’ असेही मायंदे म्हणाले.
‘कापूस वेचणी यंत्रणेसाठी गुंतवणूक हवी’
‘‘कापूस वेचणीसाठी यंत्र, यंत्रणेची मागणी आहे. कारण आपला उत्पादन खर्च कापूस वेचणी व इतर बाबींमध्ये वाढला आहे. ही यंत्रणा विकसित करण्यासंबंधी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सातत्याने काम केले.
त्यासंबंधी आम्ही काही बड्या उद्योगातील मंडळीची भेट घेतली. सुरवातीलाच त्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक हवी आहे. यासंबंधी धोरणात्मक कार्यक्रम हवा आहे. ही गुंतवणूक थेट विद्यापीठ करू शकत नाही.
त्यासाठी उद्योगांनी पुढे यावे. शासन, उद्योजक, तंत्रज्ञ यांच्यात समन्वय असायला हवा. त्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. कापसासह कांदा पिकातही यंत्रणा आवश्यक आहे,’’ असेही डॉ. मायंदे म्हणाले.
‘कांद्यात देश पुढे, पण उत्पादकतेचा प्रश्न’
डॉ. मायंदे म्हणाले, ‘‘कांदा पिकात देश पुढे आहे. उत्पादनात चीनच्या बरोबरीने किंवा इतर देशांपेक्षा पुढे आपला देश आहे. परंतु उत्पादकता कमी आहे. ही उत्पादकता आपल्याकडे प्रतिहेक्टर १४, १६ ते १७ टन अशी आहे.
त्यात वाढ होण्यासाठी नवे तंत्रज्ञान, लागवडीसंबंधीची तंत्रशुद्ध कार्यवाही आवश्यक आहे. देशात कांद्याची उत्पादकता खरिपातील अतिपाऊस व प्रतिकूल वातावरण यामुळेदेखील कमी झाली आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.