
धुळे ः ‘‘कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या (Cotton Pink Bollworm) पुढील हंगामातील नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फरदड निर्मूलन (Cotton Fardad) मोहीम राबवावी,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे यांनी केले.
कापसाचा हंगाम मधल्या टप्प्यात आहे. काही ठिकाणी तो संपुष्टात येत आहे. गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी सध्या क्षेत्रीय स्तरावर कापूस फरदड निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र अधिक उत्पन्नासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे.
फरदडीमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र अखंडित सुरू राहते. त्याचबरोबर जिनिंग व प्रेसिंग मिल, गोडाउन, मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घ काळासाठी साठवणूक केली जात आहे. त्यामुळे साठविलेल्या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंड अळीच्या अवस्थांनंतर घेतल्या जाणाऱ्या कपाशी पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात.
किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या पार्श्वभूमीवर गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करून पुढील हंगामातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अधिक व्यापक व प्रभावीपणे फरदड निर्मूलन मोहीम राबविण्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे, असे मालपुरे यांनी म्हटले आहे.
जनावरे चरण्यास सोडावीत
बोंड अळीच्या नियंत्रणासाठी डिसेंबरअखेरपर्यंत सर्व गावांतील कापूस शेतातून पूर्णपणे काढून टाकावा व फरदड घेऊ नये, पाच ते सहा महिने कापूसविरहित शेत ठेवणे, डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध न झाल्यास गुलाबी बोंड अळी सुप्तावस्थेत जाते; परंतु फरदडीमुळे किडीचे जीवनचक्र अखंडितपणे सुरू राहते.
प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. रोटाव्हेटर किंवा श्रेडर यांसारख्या यंत्राद्वारे पऱ्हाट्यांचे छोटे तुकडे करून ते जमिनीत गाडावेत, असे मालपुरे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.