
नाशिक : ‘‘नाशिक जिल्हा बँकेवर (Nashik DCC Bank) दरोडे टाकणारे दरोडेखोर हे वेगळेच आहेत. परंतु जिल्हा बँक अडचणीत आहे. रिझर्व्ह बँक (RBI) परवाना रद्द करेल म्हणून वसुलीसाठी शेतकऱ्यांना फासावर चढवले जातेय.
ज्यांनी बेकायदेशीररीत्या नियम धाब्यावर बसवून कर्जे काढली. अनेकांनी अधिकाराचा गैरवापर करून कर्जे काढली आणि थकविली. त्यामुळे बँक अडचणीत आहे. आता बँकेचा तोटा भरून काढण्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करून वसुली केली जात असेल तर आम्ही हात बांधून बसलेलो नाहीत.
पहिले बँक लुटणाऱ्या चोरांना पकडा; त्यांच्याकडून वसुली करा,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
नाशिक जिल्हा बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांविरोधात सुरू केलेल्या सक्तीची वसुली व मालमत्ता लिलावाविरोधात सोमवारी (ता.१६) ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली मालेगाव येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर हजारो शेतकऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला.
मात्र जागेअभावी आंदोलक पोलिस कवायत मैदानावर जमले होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, शेतकरी नेते अनिल घनवट, ललित बहाळे, सीमा नारोडे, अर्जुन बोराडे आदी उपस्थित होते.
‘‘वसुलीच्या किती नोटिसा बड्या थकबाकीदारांना पाठविल्या. त्यांच्यावर काय कारवाई केली. शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोर्ड लावले, तसे चोरांच्या मालमत्तेवर बोर्ड लावले का, मग ते कसे सहीसलामत सुटतात. शेतकऱ्याला वेठीस का धरले जात आहे, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एकवेळ समझोता योजना राबविली जाते का,’’ असे प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केले.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना पाळा
‘‘सरकारकडे वेगळे काही मागत नाही. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना पाळा. मूळ मुद्दलावर व्याजाची योग्य आकारणी करून एकवेळ समझोता करा, एनपीए कमी करण्यासाठी वारंवार व्याजाचे पुनर्गठन केले आहे.
व्याजाचा समावेश मुद्दलामध्ये केला आहे. त्यामुळे कर्जाच्या चौपट रकमा झाल्या आहेत. याला जबाबदार कोण? म्हणून वसुली थांबवा. रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एक वेळ समजतो योजनेचा नवीन प्रस्ताव द्या, शेतकरी तयार होतील,’’ असे शेट्टी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.