Fertilizer Inspection : खत तपासणीची त्रिस्तरीय पद्धत केंद्राकडून रद्द

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रासायनिक खते मिळण्यासाठी देशभर खतांचे नमुने काढून तपासणी केली जाते. नमुने अप्रमाणित निघाल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.
Fertilizer
FertilizerAgrowon

Pune News : शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रासायनिक खते (Chemical Fertilizer) मिळण्यासाठी देशभर खतांचे नमुने (Fertilizer Sample) काढून तपासणी केली जाते. नमुने अप्रमाणित निघाल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.

मात्र, त्यासाठी तीन टप्प्यांत नमुने काढण्याची सध्याची वेळखाऊ पद्धत आता केंद्र शासनाने बदलली आहे. कामकाज सुलभतेसाठी खत नमुना तपासणीची त्रिस्तरीय पद्धत कायमची हटविण्यात आली आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिया राजन यांनी सर्व राज्यांच्या कृषी सचिवांना एक पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.

सध्याच्या खत नमुना तपासणीत त्रिस्तरीय पद्धतीचा अवलंब केला जातो. यात सहा ते आठ महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे खत उद्योगाला अनावश्यकपणे सतत दबावात राहावे लागते.

पद्धतीत बदल करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अभ्यास सुरू होता. ही किचकट पद्धत केंद्र शासनाने ‘कामकाज सुलभता’ (इज ऑफ डुइंग बिझनेस) गटात आणावी, असे आदेश दिले होते.

Fertilizer
Grape Fertilizer Management : द्राक्ष खरडछाटणी काळातील खत व्यवस्थापन

खत तपासणीसाठी नमुना काढल्यानंतर कंपनीला आक्षेप घ्यायचा असल्यास आठवडा भरात अपील करावे लागणार आहे.

याचाच अर्थ एक आठवड्यानंतर कंपनीला कोणतीही हरकत घेता येणार नाही. “कृषी विभागांनी आता खत परीक्षणाची पद्धत सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी पुरेसे निरीक्षक नेमावेत,” असेही सूचित केले आहे.

देशातील खतांची तपासणी खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार केली जाते. या आदेशात दुरुस्ती करण्याचे अधिकार ‘अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५’ मधील तिसऱ्या कलमानुसार केंद्राला आहेत. त्यानुसार आता एक मार्चपासून देशात खत दुरुस्ती आदेश २०२३ लागू केला आहे.

Fertilizer
Sugarcane Nitrogen Fertilizer : उसामध्ये नत्र खताचा वापर फायदेशिर का आहे?

नवी पद्धत खर्चिक ठरण्याची शक्यता

नव्या खत दुरुस्ती आदेशानुसार लागू करण्यात आलेली खत नमुना तपासणीची नवी पद्धत छोट्या उत्पादकांसाठी खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.

“रेफरी विश्‍लेषणासाठी विक्रेते किंवा खत कंपनीला जादा पैसे मोजावे लागतील. सेंद्रिय खताच्या एका रेफेरी नमुन्यासाठी ८२६० रुपये द्यावे लागतील. चार घटक तपासण्यासाठी ४७२० रुपये मोजावे लागतील.

पहिल्या सात दिवसात अर्ज न केल्यास विक्रेता किंवा कंपनीला पुढे कोणती भूमिका घेता येणार नाही. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढावा,” अशी मागणी खत उद्योगातील एका छोट्या उद्योगाने केली आहे.

सध्याची खत तपासणी पद्धत अशी...

- राज्य शासनाकडून अधिसूचित कोणत्याही प्रयोगशाळेत खताच्या पहिल्या नमुन्याची तपासणी

- कंपनीच्या प्रतिनिधीने पहिल्या चाचणीवर अपील केल्यानंतर दुसऱ्या नमुन्याची तपासणी

- पहिल्या आणि दुसऱ्या खत नमुना चाचणीत भिन्नता आढळल्यास तिसरी चाचणी

खत तपासणीची नवी पद्धत अशी...

- खत निरीक्षक आता एकाच वेळी खताचे तीन नमुने गोळा करून अधिसूचित प्रयोगशाळेत पाठविणार

- उर्वरित दोन नमुने राज्य शासनाच्या यंत्रणेकडे जतन होणार

- काही आक्षेप असल्यास कंपनीच्या खत विक्रेत्याने नमुना काढताच पहिल्या सात दिवसांच्या आत अर्ज करणे बंधनकारक

- पहिल्या सात दिवसांच्या आत अर्ज करताच खताचा दुसरा नमुना अधिकृत प्रयोगशाळेतून, अथवा राष्ट्रीय परिक्षणगृहात (एनटीएच) तपासला जाणार

- या दोन्ही अहवालांमध्ये भिन्नता आढळली तरच तिसरा नमुना थेट फरिदाबादच्या मध्यवर्ती खते गुणनियंत्रण व प्रशिक्षण संस्थेकडे पाठविणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com