केंद्रीय पथकाकडून खेड, शिरूरमध्ये जलशक्ती अभियानाच्या कामांची पाहणी

केंद्रीय पथकाने शिरूर व खेड तालुक्यांतील मृद्‍ व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, सिमेंट, नाला, बंधारे तसेच मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली.
Jalshakti Abhiyan
Jalshakti AbhiyanAgrowon

पुणे : जलशक्ती अभियानांतर्गत (Jalshakti Abhiyan) जिल्ह्यात झालेल्या कामांची केंद्रीय पथकाने शिरूर व खेड तालुक्यांत क्षेत्रीय भेटी देऊन पाहणी केली. या वेळी अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांचे कौतुक केले.

केंद्रीय पथकाने ‘कॅच द रेन’अंतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांबाबत आढावा बैठक घेतली. या वेळी केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या संचालिका स्मिता श्रीवास्तव, केंद्रीय जल, ऊर्जा व संशोधन संस्थेचे वैज्ञानिक सरबजित सिंग, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, रोहयो उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने शिरूर व खेड तालुक्यांतील मृद्‍ व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, सिमेंट, नाला, बंधारे तसेच मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. खेड येथील वनविभागाच्या नर्सरीला भेट देऊन येथील कामांची पाहणी केली. शिरूर नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भेट देऊन ही संपूर्ण इमारत सौरऊर्जेवर कार्यान्वित असल्याबद्दल तसेच येथील रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम प्रशंसनीय असल्याबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.

रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती लाभशेटवार यांनी जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेली कामे, तसेच अमृत सरोवर अभियानांतर्गत होत असलेल्या कामांबाबत माहिती दिली. या अभियानात सामाजिक संस्थेच्या मदतीने सरोवरातील गाळ काढण्याची कामे करण्यात येत आहेत. तसेच जलसंवर्धनासंबंधी नव्याने हाती घेण्यात येत असलेली कामे, अस्तित्वातील कामांची दुरुस्ती करून पुनर्वापर करण्याबाबत विविध यंत्रणांमार्फत माहिती देण्यात आली. अमृत सरोवरातील काढलेला गाळ पुन्हा शेतीसाठी वापर होत असल्यामुळे पथकाने कामाचे कौतुक केले.

पथकाने अभियानात समाविष्ट यंत्रणांकडून जलशक्तीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेत जिल्ह्यात झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग पोर्टलवर अपलोड करण्याकरिता प्रभावी नियोजन करून कामे पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय, येरवडा येथील जलशक्ती केंद्रास पथकाने भेट देऊन केंद्राच्या कामाविषयी माहिती घेतली असल्याचे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी जलशक्ती अभियान तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com