
Solapur News : पंढरपुरात आज रविवारी (ता. २) चैत्र शुद्ध एकादशीचा (Chaitri Ekadashi) सोहळा साजरा होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी (Vithhal rukmini Darshan) परराज्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून शनिवारी (ता. १) सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पंढरीत राज्यातील विविध भागांतून दिंड्यांसह वारकरी दाखल होत आहेत. शनिवारीही दिंड्या दाखल होत होत्या. विशेषतः चंद्रभागा नदी, नगरप्रदक्षिणा मार्ग, ६५ एकर परिसरासह सर्वत्र वारकऱ्यांची गर्दी आहे.
शनिवारी (ता.१) दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने हा पर्वकाळ साधण्यासाठी पहाटेपासूनच नदीतीरावर स्नानासाठी वारकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली.
चंद्रभागेतील स्नान आणि त्यानंतर नगरप्रदक्षिणेकडे वारकऱ्यांची पावले वळत होती. शनिवार सकाळपर्यंत सुमारे दोन लाखांवर वारकरी पंढरीत दाखल झाले. आज मुख्य सोहळा होत असल्याने त्यात आणखी किमान दुपटीने वाढ होईल, असा अंदाज आहे.
कीर्तन, प्रवचनांसह रंगली भजने
दिवसभर शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये कीर्तन आणि प्रवचनांसह भजने रंगल्याचे चित्र होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनाची रांग आजही गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत पोहोचली होती. प्रतिमिनिटाला ३० ते ४० वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत.
वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांची तयारी पूर्ण
वारीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनानेही तयारी केली आहे. स्वच्छतेसाठी मंदिर परिसर, संतपेठ, स्टेशन रोड, जुनी पेठ-गोविंद पुरा, नवीपेठ-इसबावी, मनिषा नगर-इसबावी असे पंढरपूर शहराचे सहा विभाग केले आहेत.
वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी विविध ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट ६५ एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी तात्पुरते २५० शौचालय उभारण्यात आली आहेत. वाहनतळांवर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी बॅरेकेडिंग करण्यात आले आहे.
शंभू महादेवाच्या कावडीही पंढरीत
रविवारी (ता.२) चैत्री वारीचा सोहळा होत आहे. पण शनिवारी (ता.१) शिखर शिंगणापूर येथील यात्रा होती.
त्यामुळे अनेक वारकरी विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भाविक शंभू महादेवाची कावड खांद्यावर घेऊन शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी रवाना झाले. पण येताना कावडीसह ते आवर्जून पंढरीत दाखल होत होते.
तसेच चंद्रभागा नदीत कावडीला स्नान घालून महाद्वार परिसरातील नामदेव पायरीचे दर्शन घेत असल्याचे चित्र होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.