
अकोला ः रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड (Chana Sowing) यंदा कमालीची वाढली असून, आतापर्यंत एक लाख हेक्टरचा टप्पा लागवडीने ओलांडला आहे. जिल्ह्यात सर्व पिके मिळून या हंगामात नियोजित लक्ष्यांकाच्या सुमारे १०३ टक्के पेरणी (Chana Cultivation) झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर गव्हाची (Wheat Sowing) १४५२० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली.
गेल्या काही वर्षांत खरीप हंगामात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा हे समीकरण तयार झाले आहे. अकोला जिल्ह्यात खारपाण पट्ट्यात, तर हरभऱ्याचे पीक हे हमखास उत्पादन देणारे मानले जात आहे. त्यामुळे खरीप पीक काढून झाले की शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतात.
जिल्हयात रब्बीत हरभऱ्याचे ९४६७८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. या वर्षी आतापर्यंत १ लाख १३२३ हेक्टरवर पेरणी झाली. सध्याही शेतकरी हरभरा, गहू पिकाची लागवड करण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यामुळे रब्बीचे हे क्षेत्र आणखी वाढणार आहे.
जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरलेले असल्याने सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झालेली आहे. जिल्ह्यात वाण, काटेपूर्णा या दोन मोठ्या प्रकल्पावरूनच सुमारे १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचनाचे नियोजन झालेले आहे. चांगल्या पावसाने पाणीपातळी वाढलेली असून, विहिरी, कूपनलिकांमध्येही पाण्याची उपलब्धता झालेली आहे. या सर्व गोष्टी रब्बीसाठी पोषक ठरलेल्या आहेत.
अकोला जिल्ह्यात बरेच शेतकरी कपाशीचे पीक उपटून हरभरा, गहू पेरणीच्या तयारीला लागलेले आहेत. जानेवारीच्या मध्यापर्यंत शेतकरी लागवडीचे नियोजन करण्यात व्यस्त असतात. या सर्व बाबींमुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
पीकनिहाय क्षेत्र व लागवड
पीक सरासरी प्रत्यक्ष लागवड टक्केवारी
हरभरा ९४६७८ १०१३२३ १०३
गहू २१५८८ १४५०२ ६७
ज्वारी १००८ ५२३ ५२
मका ४४१ १२७ २९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.