Chevening Scholarship: नऊ वर्ष शेतीत राबून मिळवली इंग्लंडमधील 'स्कॉलरशिप'

ज्या ब्रिटिशांनी (British) भारताच्या शेतीचं खेळखंडोबा करून भारतीय जनता पिचवली, त्याच ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून आकाशने ही स्कॉलरशिप (Scholarship) पटकावलीय. आणि ते ही सलग नऊ वर्ष शेतीत राबून. (Chevening Scholar Akash Navghare)
Chevening Scholar
Chevening ScholarAgrowon

तुमचा मुलगा काय करतो ? शेती... असं म्हटलं की लोकांचे चेहरे बघण्यासारखे होतात. कधीकधी नाक मुरडली जातात. सगळ्यांनाच आता सरकारी नोकरी प्यारी असते तिथं शेतीचा काय घेऊन बसलात असा टोमणा तर हमखास कानावर पडणार. त्यामुळं शेती करतोय, हे लपवण्यात अनेक जण धन्यता मानतात.

पण मंडळी काहीजण असले भन्नाट असतात ना, की या टोमण्यांना फाट्यावर मारत शेतीत ते अशी काही झेप मारतात की, त्यांचा जगभरात डंका वाजतो.

असलीच 'शांतीत' अर्थात 'शेतीत क्रांती' केलीय नागपूरच्या आकाश नवघरे (Akash Navghare) या पठठ्याने. ज्या ब्रिटिशांनी (British) भारताच्या शेतीचं खेळखंडोबा करून भारतीय जनता पिचवली, त्याच ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून आकाशने ही स्कॉलरशिप (Scholarship) पटकावलीय. आणि ते ही सलग नऊ वर्ष शेतीत राबून.

तर नागपुरातल्या महाजनवाडी हिंगणा इथं राहणाऱ्या आकाशनं रामदेवबाबा महाविद्यालयातून (Ramdevbaba Engineering College) इंजिनिअरिंग पूर्ण केलं. इंजिनिअरिंग केलेल्या पोराला लाखभर रुपये पगार मिळावा अशी अपेक्षा घरापासून पै-पाहुण्यांपर्यंत तर सगळ्यांनाच असणार. पण आकाशला काय या लाखभर पगाराचा मोह झाला नाही. त्याला काहीतरी वेगळं कारायचं होत..शाश्वत असं..

अर्थात शाश्वततेचा मार्ग येऊन थांबतो आपल्या शेतीमाती संस्कृतीपाशी. आकाशने ठरवलं आता काम करायचं ते शेतीतचं. नागपुरात (Nagpur) देशी वाण व विषमुक्त उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी वाण उपलब्ध व्हाव, तसेच सेंद्रीय शेतीचाही प्रचार प्रसार व्हावा, या उद्देशाने बिजोत्सवाला सुरुवात झाली होती. आकाश 2013 मध्ये बिजोत्सवशी जोडला गेला.

शेतीचं नेमकं अर्थशास्त्र कळावं म्हणून आकाशने अर्थशास्त्रात एम. ए सुद्धा केलं. शेतकरी शाश्वत शेती, सेंद्रिय नैसर्गिक शेतीकडे वळला पाहिजे यासाठी त्याने धडपड सुरु केली. गडचिरोलीसारख्या अति दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेणे, तज्ज्ञांकडून शेतकरी व ग्राहकांसाठी मार्गदर्शन घडवून आणणे यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले. शेतीत त्याने आपली ऐन उमेदीची नऊ वर्षे घालवली.

आणि कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं....

आकाशने गरिबी विकास यावर भर देण्यासाठी शेतीला अनुसरून पुढे उच्च शिक्षण घेण्याचे ठरवलं. त्याने ब्रिटिश सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या मानाच्या व प्रतिष्ठीत अशा ‘चेवनिंग’ स्कॉलरशिपसाठी अर्ज केला.

ही स्कॉलरशिप कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी जगभरातील 160 देशांतून जवळपास 60 ते 70 हजार युवक अर्ज करतात. त्यातून केवळ 800 ते 900 युवकांची निवड होते.

या शिष्यवृत्तीसाठी आपल्या भारतातून आकाशने बाजी मारली. तो फूड अॅण्ड डेव्हलपमेंट या वेगळ्या विषयासाठी पात्र ठरला. आता तो इंग्लंडमधील इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज या जगातील पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयात फूड ॲण्ड डेव्हलपमेंट आणि पॉवर्टी अॅण्ड डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमाचे धडे गिरविणार आहे.

इंग्लंडच्या शिष्यवृत्तीसोबतच (England Scholarship) जागतिक बँकेच्या (World Bank) शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आकाशाची निवड झाली. या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या दोन भारतीयांपैकी तो एक आहे. ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या विषयाकरिता एकाच वेळी दोन जागतिक शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणारा आकाश कदाचित नागपुरातील पहिला तरुण असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेवटी कसाय ना विषय कोणताही असो तो खोलवर नेऊन गोल करण्याची धमक भारतीयांमध्ये आहे हे वेळोवेळी सिद्ध झालंय. आणि शेतीच्या माध्यमातून तुम्ही जगभरात प्रसिद्ध होऊ शकता हे आकाशने आपल्याला दाखवून दिलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com