
Wardha Sahitya Sammelan 2023 : ‘‘सरकारी साहित्य संमेलनामुळे यथावकाश साहित्याचे सरकारीकरण होऊ शकते. साहित्याचा संसार गरिबीत राहिला तरी चालेल पण तो सरकारच्या नियंत्रणात जाऊ नये, याचे भान साहित्य संस्था आणि साहित्यिकांनी राखले पाहिजे,’’ अशी रोखठोक भूमिका ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी मांडली.
संमेलनाचे उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी संमेलनाचे पूर्व अध्यक्ष भारत सासणे, स्वागत अध्यक्ष दत्ता मेघे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, ख्यातनाम हिंदी साहित्यिक विश्वनाथ प्रसाद तिवारी, हिंदी कवी कुमार विश्वास, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.
चपळगावकर म्हणाले, ‘‘शासकीय अनुदान न घेता संमेलने आयोजित करता यावी म्हणून एक अधिकोष निर्माण केला. त्यातही आपण लक्षणीय भर टाकू शकलेलो नाही. जमलेल्या निधीतून सध्याच्या पद्धतीनुसार आयोजन करायचे म्हटले तर एक ही संमेलन घेता येणार नाही.
त्यावरूनच आपला साहित्य व्यवहार दिवसेंदिवस आधी खर्चिक होत चालला आहे. साहित्य संमेलनाचा खर्च जसजसा वाढत आहे. तसतसे अगतिकपणे शासनावरचे अवलंबित वाढत आहे.
कल्याणकारी शासन या संकल्पनेने हळूहळू समाजाची स्वयंसेवी वृत्ती आणि उपक्रमशीलता नष्ट होत चालली आहे. याचा परिणाम समाजाच्या स्वायत्ततेवर होणारच आहे. हे वास्तव लक्षात घेऊन आत्मपरीक्षणाची गरज आहे.’’
ग्रंथदिंडीत कापसाला मान
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्याला राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांची मोठी उपस्थिती होती. ग्रंथ दिंडीमध्ये महात्मा गांधी यांची ग्रंथसंपदा ठेवण्यात आली. वर्धा जिल्ह्याचे वैभव असलेल्या कापसाला देखील साहित्य संमेलनात मानाचे स्थान देण्यात आले.
‘‘साहित्य संमेलनासाठी मराठी माणसं ओढीने हजेरी लावतात. त्यांच्यासाठी दरवर्षी हे संमेलन पंढरीची वारी करावी तितक्याच आस्थेचे प्रतीक राहते. हा चमत्कार घडविणारी भाषा माझी मराठी आहे, याचा मला अभिमान आहे,’’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘‘ज्यांनी आपला देश बळकावून बसलेल्या ब्रिटिशांना म्हणजे परकीयांना ‘चले जाव’ असे ठणकावले आणि स्वकीयांना खेड्याकडे चला हा मंत्र दिला. त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीला मी सर्वप्रथम वंदन करतो.
मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा यांच्या विकासासाठी अशा प्रकाराची संमेलने आवश्यक असतात. त्याने मराठी साहित्याच्या पोषणाला हातभार लागतो. त्यामुळे ती होणे आवश्यक आहे,’’ असेही शिंदे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.