विकास आराखड्यातील कामांचा फेरआढावा

राज्य सरकारचे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आदेश
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

पुणे ः राज्यातील सत्तांतराचा फटका जिल्ह्यातील विकासकामांना बसला आहे. माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या जिल्हा वार्षिक आराखड्यातील प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांना नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी (ता. ४) स्थगिती दिली. या विकास आराखड्यातील कामांचा फेरआढावा घेण्याचा आदेश राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांना दिला आहे.

श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने पुणे जिल्ह्याचा २०२२-२३ साठीचा सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक विकास आराखडा मंजूर केला होता. हा वार्षिक आराखडा मार्च २०२२ मध्येच मंजूर केला असून, यामध्ये प्रस्तावित केलेल्या विकासकामांपैकी काही कामांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

Eknath Shinde
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री

दरम्यान, राज्यात जूनअखेरीस सत्तांतर झाले. त्यामुळे पूर्वीचे महाविकास आघाडीचे सरकार जाऊन नवे सरकार सत्तेत आले. या सत्तातरानंतर तत्कालीन पालकमंत्री आता माजी झाले आहेत. जिल्ह्याला लवकरच नवे पालकमंत्री मिळणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही स्थगिती दिल्याचे राज्याच्या नियोजन विभागातील उपसचिव सं. ह. धुरी यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Eknath Shinde
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

तीन महिन्यांतील कामांवर परिणाम

राज्य सरकारने या परिपत्रकानुसार १ एप्रिल २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे या निर्णयाने मागील तीन महिन्यांत मंजूर झालेल्या जिल्ह्यातील सर्व विकासकामांना स्थगिती दिली आहे. या कामांचा आता नव्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समिती निर्णय घेणार आहे.

शिवतारे यांची मागणी

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या ८७५ कोटींच्या विकास आराखड्यास पालकमंत्री अजित पवार यांनी घाईघाईने मान्यता दिली आहे. या आराखड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना निधीचे बेसुमार वाटप करून शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांना अत्यंत नगण्य निधी दिला आहे. त्याला स्थगिती देऊन नवीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निधीचे समन्यायी पद्धतीने फेरवाटप करावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली होती.

आढळराव, सोनवणेंची निधी वाटपावर टीका

शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार यांनी सत्तांतर झाल्यानंतरच्या शिवसेनेच्या मेळाव्यातदेखील जिल्हा नियोजन समितीमधील सदस्यांच्या निधी वाटपावर टीका केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणावर निधी तर शिवसेनेच्या सदस्यांनी सुचविलेल्या कामांना निधी न दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तर शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांना (राष्ट्रवादीला) गुलाबजाम आणि आम्हाला साधा डाळभात पण नाही, अशी टीका केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com