
रत्नागिरी ः गेल्या सात वर्षांपासून जिल्ह्यातील ११ हजार ३२६ आंबा बागायतदारांचे (Mango Growers) २२३ कोटी ८६ लाख रुपये थकीत आहेत. कोरोनामुळे बागायतदार कर्जाच्या खाईत गेले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफ (Loan Waive) करावीत यांसह अन्य महत्त्वाच्या नऊ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आंबा बागायतदारांतर्फे देण्यात आले. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊन बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री शिंदे यांची आंबा बागायतदार संघटनांनी भेट घेतली. या वेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे प्रदीप सावंत, प्रकाश साळवी, प्रसन्न पेठे, आनंद देसाई आदी बागायतदारांनी पुढील मागण्या मांडल्या.कोरोनातील दोन वर्षे गंभीर परिस्थिती होती. त्यापूर्वी आठ वर्षे निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वसामान्य आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे.
आंबा बागायतदारांची संख्या १ लाख ९ हजार ७४७ आहे. २०१४-१५ पासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली गंभीर संकटे आणि त्यामधून मार्ग काढण्यासाठी अद्याप चर्चा घडून आलेली नाही. अवकाळी पाऊस आणि उष्ण हवामानाने उत्पादन घटत आहे. यावर उपाययोजना आवश्यक आहे. हंगामातील आंब्याला हमीभाव मिळणे आवश्यक आहे.
खरेदीदारांकडून आंब्याचा दर ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळाला पाहिजे. प्रभावी कीटकनाशके व बुरशीनाशके बागायतदारांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. वानरांकडून बागाच्या बागा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना केल्या पाहिजेत.जिल्हा बँकांकडून कमी दरात म्हणजे चार टक्के दराने कर्जे मिळावीत.
सध्याच्या विमा योजनेचा फार उपयोग होत नाही. त्यात बदल करावेत. कृषिपंपांच्या वीजबिलात झालेली वाढ रद्द करावी आणि बागांसाठीचे पंप कृषी म्हणून मान्यता द्यावी. कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती करावी. सातबारा कोरा करून नवीन कर्जे उपलब्ध करून दिल्यास बागायतदार सुस्थितीत येईल, अशा मागण्याही केल्या. गेल्या हंगामात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने आंबा नाशवंत झाला. त्याचा सर्व्हे करून नुकसान भरपाई मिळावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.