
Jalgaon News जिल्हा बँकेचे कुठेही एटीएम (DCC Bank ATM) नाही. परंतु बँकेतर्फे पीक कर्ज (Crop Loan) रोखीने मिळत नाही. ते एटीएममधून काढावे लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना सीबिल लागू करण्याबाबत शासनाने नकार दिला आहे. तरीदेखील बँकेतर्फे सिबिल (Farmer CIBIL Verification) तपासणीपोटी शेतकऱ्यांकडून शुक्ल वसूल केले जात आहे.
‘‘एटीएममधून पैसे काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी खासगी व इतर बँकांच्या एटीएमवर जावे लागत आहे. त्यात एका वेळेस पैसे काढताना १७ रुपये शुल्क शेतकऱ्यांच्या खात्यातून कपात केले जात आहे. तसेच सीबिल तपासणी करूनच पीककर्ज दिले जात आहे,’’ असे शेतकरी नेते किरण पाटील (सनपुले, जि. जळगाव) यांनी सांगितले.
सिबिल शेतकऱ्यांना लागू करू नका. त्यासाठी बँका शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवणूक करीत आहेत. ग्रामीण व इतर बँका व्यावसायिक होत आहेत.
शेतकऱ्यांना पीककर्जवितरणाचा लक्ष्यांक बँका पूर्ण करीत नाहीत. त्यात सीबिलचे कारण बँका पुढे करतात. याच सीबिल तपासणीसाठी जळगाव जिल्हा बँकेतर्फे १६४ रुपये प्रतिवर्ष आकारणी केली जात आहे.
तसेच सेवा शुल्क म्हणून प्रतिवर्ष २३६ रुपये आकारले जात आहेत. एटीएममधूनच पीककर्ज शेतकऱ्यांना दिले जात आहे. यासाठी एका वेळेस पैसे काढताना १७ रुपये एवढे शुल्क शेतकऱ्याला द्यावे लागत आहे.
आशिया खंडात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून जिल्हा बँकेचा लौकिक होता. परंतु बँकेचे कुठेही एटीएम नाही. शिवाय बँक शेतकरीपूरक कमी व व्यावसायिक अधिक बनली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
याबाबत बँकेच्या प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी सुधारणा करून विनाकारण किंवा अनावश्यक शुल्क आकारणी बंद करावी, अशी मागणी किरण पाटील यांनी व्यक्त केली.
बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक
जिल्हा बँकेची मागील सभा कोरमअभावी तहकूब झाली. आज (ता. १५) बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे.
या बैठकीत सर्व संचालकांनी उपस्थित राहावे. संचालकांना शेतकऱ्यांनी शेतकरी हिताची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे.
त्यांनी सभांना उपस्थित राहून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत. आजच्या सभेत सीबिल तपासणी, एटीएम शुल्क आकारणी बंद करण्याचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी किरण पाटील यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.