Sanen goat Import : सानेन शेळीच्या भारतातील आयातीचा मार्ग मोकळा

केंद्राची पोलंडवरून आयात करण्यास मान्यता
Sanen goat Import
Sanen goat ImportAgrowon

मुंबई : दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या सानेन शेळीच्या (Sanin Calf)आयातीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने (Central Government) पोलंडवरून शेळी आयात करण्यास मान्यता दिली आहे. ही शेळी आणण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडे प्रजनन धोरण काय आहे, अशी विचारणा केंद्राने केली आहे. सरकारने २०१४ मध्ये तयार केलेले प्रजनन धोरण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडे (Government Animal Husbandry)पाठविले आहे. लवकरच शेळ्या आयात करण्यात येतील, असा विश्‍वास पशुसंवर्धन विभागाला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून सानेन शेळी आयात करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. केंद्र सरकारने नेदरलँड, पोलंड, डेन्मार्क आणि दक्षिण आफ्रिका या चार देशांकडे शेळ्या आयात करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. कमी खर्चात केवळ मांसविक्रीसाठी नव्हे तर दुधासाठी शेळीपालन करण्यासाठी अहिल्याबाई होळकर शेळी व मेंढी महामंडळाने वर्षभरापूर्वी सानेन शेळी आयात करण्यासाठी दीड कोटी रुपयांची टेंडरप्रक्रिया राबविली होती. ४० शेळ्या आणि पाच नर आयात करण्याबाबत हा प्रस्ताव होता.

Sanen goat Import
Crop Harvesting : सुगीच्या कामामुळे दिवाळीतही शेतकऱ्यांना नाही उसंत

पहिल्या टप्प्यात ही शेळी अमेरिकेतून मागविण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र अमेरिकन सानेन शेळीला वेसिक्युलर स्टोमाटायटिस हा आजार असल्याने त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने नकार दिला. हा आजार भारतात नसल्याने त्याची उपचारपद्धती, लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा आजार पसरण्याचा आणि देशी शेळ्यांना धोका निर्माण झाल्यामुळे भारतात आयातीला परवानगी नाकारली.

दरम्यान, पोलंडसह अन्य चार देशांच्या दूतावासांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. या शेळ्या भारतात आणण्यासाठी डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडर आणि केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाची परवानगी लागते. ती परवानगी मिळाली आहे. हा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडे गेला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या शेळ्यांच्या आयातीसाठी राज्य सरकारचे प्रजनन धोरण आणि ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. या कागदपत्रांची पूर्तता राज्य सरकारने केल्यानंतर पशुसंवर्धन विभाग आता शेळी आयात करण्याच्या तयारीत आहे. या शेळ्या आयात करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत निधी मिळेल. या शेळ्या महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स विद्यापीठाच्या केंद्रात ठेवण्यात येतील. येथे या शेळ्यांचे प्रजनन, दोन जातींतील संकर आणि अन्य संशोधन करण्यात येईल.

सानेन उष्ण वातावरणाशी जुळवून घेणार?

सानेन ही थंड प्रदेशातील शेळी महाराष्ट्रातील उष्ण वातावरणाशी कशी जुळवून घेते, या बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र या शेळ्या भारतात आल्यानंतर त्यांना काही काळ क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवले जाईल. सानेन जातीच्या एका शेळीची किंमत ७० हजार ते एक लाख रुपये आहे. तर बोकडाची किंमत दीड लाखापर्यंत आहे. पहिल्या टप्प्यातील ४० शेळ्या आणि आठ बोकड आणले जातील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com