
तळोदा, जि. नंदुरबार ः सातपुड्यातील मशरूम उत्पादक (Mushroom Production) राजेंद्र वसावे यांच्या काठी (ता. अक्कलकुवा) येथील मशरूम युनिटला (Mushroom Unit) जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी भेट दिली. दरम्यान, युनिटमध्ये वीज उपलब्ध नसताना जिल्हाधिकारी खत्री यांनी मोबाईलच्या उजेडात मशरूम युनिटची पाहणी केली व माहिती घेतली.
मशरूम उत्पादक वसावे दांपत्य व परिसरातील युवकांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. दुर्गम भागात भेट देऊन अंधारात पाहणी करणाऱ्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे कौतुक होत आहे.
मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे सातपुड्यातील गोरगरीब, गरजू नागरिकांना स्थानिक पातळीवर उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध व्हावेत यासाठी मशरूम शेतीबाबत व मशरूमच्या मार्केटिंगबाबत मार्गदर्शन करीत त्यांना स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
त्यांच्या काठी (ता. अक्कलकुवा) येथील मशरूम युनिटला गुरुवारी जिल्हाधिकारी खत्री यांनी भेट दिली. या वेळी सहायक जिल्हाधिकारी तथा तळोद्याचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, अक्कलकुवा तहसीलदार रामजी राठोड,सी. के. पाडवी, सरपंच जितेंद्र पाडवी, सामाजिक कार्यकर्ते बहादूरसिंग पाडवी, गणपतसिंग पाडवी कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
या वेळी राजेंद्र वसावे यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना मशरूमपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची, मशरूमच्या फायद्यांबाबत माहिती देत, मशरूमचा अमृत आहार योजनेत व शालेय पोषण आहारात समावेश करण्याची विनंती केली, जेणेकरून नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणचा व इतर समस्यांवर मात करणे शक्य होईल.
या वेळी वसावे यांनी मशरूम लागवडीपासून ते मशरूमची मार्केटिंगपर्यंतची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली. मशरूम उद्योगातून सातपुड्याच्या दुर्गम भागातील बेरोजगार युवकांना कशा प्रकारे स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होतो, त्यांची आर्थिक प्रगती साधली जात आहे याची माहिती दिली.
या वेळी राजेंद्र वसावे व त्या ठिकाणी जमलेल्या युवकांनी जिल्हाधिकारी खत्री यांच्याकडे मशरूम युनिटसाठी एका पॅकहाउसची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ते लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
मदतीचे आश्वासन...
राजेंद्र वसावे व त्यांच्या पत्नी सातपुड्याच्या दुर्गम भागात घेत असलेल्या मशरूमच्या उत्पादनाबाबत व याबाबतच्या कामाचे कौतुक जिल्हाधिकारी खत्री यांनी केले. त्यांना ‘आत्मा’अंतर्गत गट स्थापन करण्याची सूचना केली व उपस्थित अधिकाऱ्यांना देखील याबाबत लक्ष देण्याचा सूचना त्यांनी केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.