समोर या, मी राजीनामा तयार ठेवलाय : उद्धव ठाकरे

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी सोमवारी (ता. २०) पुकारलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon

मुंबई : जे आमदार कुठे गेले आहेत, त्यांनी समोर यावे. तुमच्यातील एकाने जरी सांगितले, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको, तर मी राजीनामा तयार ठेवलाय, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांपुढे ठेवली आहे.

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी सोमवारी (ता. २०) पुकारलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ (Political Crisis In Maharashtra) उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंडखोरांना आवाहन करताना बुधवारी (ता. २२) वेळप्रसंगी मुख्यमंत्रिपदच नव्हे, तर शिवसेनापक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे, मात्र तुम्ही समोर या, फोन करा यानंतर मी निर्णय घेईन, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बोलण्यासारखे बरेच आहे. कोविड काळात लढाई लढलो. कठीण काळात कोणीही तोंड दिले नाही अशा परिस्थितीत मला जे करायचे ते काम प्रामाणिकपणे केले. या कामाकरिता देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही गौरव करण्यात आला होता.’’

‘‘माध्यमात अनेक अफवा आहेत. शस्त्रक्रिया झाल्यामुळे मी भेटू शकत नव्हतो. तेव्हा पहिली कॅबिनेट रुग्णालयात घ्यावी लागली. आता भेटायला सुरुवात केलीय. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही, म्हणूनच आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. विधानसभेत हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले नाही आणि सोडणारही नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, अशी बातमी पसरविण्यात आली. २०१४मध्ये आपण एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आणले, ते पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांचीच, पण मधल्या काळात जे मिळविले, ते याच शिवसेनेने,’’ असा विश्‍वास श्री. ठाकरे यांनी बोलताना दिला.

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल- परवा निवडणूक झाली. हॉटेलमध्ये गेलो, तेव्हा बोललो, पण ही कुठली लोकशाही. मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम पूर्ण करणारा माणूस आहे. कुठलाही अनुभव नव्हता. नाइलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले, घटक पक्षात ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. त्याशिवाय सरकार पुढे चालणार नाही. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली. नुसता स्वार्थ नव्हता.’’

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘या सर्व प्रकाराने होय, मला धक्का बसलाय. आपण सत्तेसाठी एकत्र आलो. या घटनाक्रमानंतर मला काँग्रेसचे कमलनाथ, शरद पवार यांचे आम्ही तुमच्या समवेत आहोत, असा विश्‍वास व्यक्त करणारे फोन आले. मात्र माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो, पण त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले, की मी मुख्यमंत्री नको तर मी पद सोडायला तयार आहे, पण हे समोर येऊन बोला. आजपासून मी वर्षा बंगल्यावरून मुक्काम मातोश्रीला हलवतोय.’’

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘एकदा ठरवूया. समोर या. सांगा, आम्हाला संकोच वाटतोय, असे असले तरी स्पष्ट सांगा. मी पद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पदात नाही. मात्र पदाद्वारे केलेल्या कामानंतर त्या प्रतिसादात आहे. कोविड काळात मी केलेले आवाहन आणि कामांमुळे अनेकांनी मला ‘तुम्ही आमच्या कुटुंबीयांप्रमाणे संवाद साधतात’ असे म्हणाले. हीच माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो, त्यांनी मला सांगावं मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो पुढे मी या किंवा कोणत्याही पदावर नसलो आणि कधी भेटलो, तर ‘तुमचे प्रेम असे ठेवा!.’’

‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’

आपल्याला लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीची गोष्ट माहीत आहे. एका झाडावर तो कुऱ्हाडीने घाव घालतो, तेव्हा बहरलेल्या या झाडावरील पक्षी झाडाला विचारतात, ‘झाडा तुला या कुऱ्हाडीच्या घावांनी खूप वेदना होत असतील, तेव्हा झाड म्हणते, ‘‘मला कुऱ्हाडीच्या घावाने नव्हे, तर त्या कुऱ्हाडीचे लाकूड हे माझ्या फांदीचे लाकूड आहे, याच्या मला वेदना होत आहे.’’ तेव्हा अशी अवस्था पक्षाची होऊ नये याची आशा मी करतो, श्री. ठाकरे म्हणाले.

पक्ष प्रमुखपदपण सोडायला तयार

संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक असतो. शिवसैनिक सोबत आहे, तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. एकाजरी शिवसैनिकास वाटत असेल, की मी पक्ष प्रमुख पद सोडावे, तर त्यासही मी तयार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com