
Crop Damage Compensation News औरंगाबाद : अतिवृष्टी, सततचा पाऊस व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान (Crop Damage) भरपाईपोटी (Compensation) मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजूनही २७१८ कोटी रुपये देणे बाकीच असल्याची स्थिती आहे. तीन महिने उलटूनही मदत न मिळाल्याने शासनाने जाहीर केलेली मदत खात्यावर जमा होणार केव्हा, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जून ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आला होता.
अतिवृष्टी, सततचा पाऊस गोगलगायींच आक्रमण आदी नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४८ लाख ४५ हजार ७३९ शेतकऱ्यांच्या जिरायत, बागायत व फळ पिकांचे मिळून ३२ लाख २३ हजार १७२ हेक्टरवर नुकसान झाले होते.
या नुकसानीपोटी विभागाकडून ४४८० कोटी ८७ लाख रुपयांच्या मदत निधीची मागणी करण्यात आली होती. या मागणीत जिरायत पिकासाठीच्या ४३१२ कोटी ३३ लाख रुपयांसह बागायत पिकांसाठीच्या ५९ कोटी ६२ लाख ७५ हजार तर फळ पिकांसाठीच्या १०८ कोटी ९१ लाख ३४ हजार रुपयांच्या निधी मागणीचा समावेश होता.
सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला १००८ कोटी ३० लाख ८१ हजार त्यानंतर ५९७ कोटी ५४ लाख, त्यानंतर ९८ कोटी ५८ लाख व ५९ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला.
परंतु अजूनही सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी आवश्यक १२१४ कोटी ७२ लाख ५७ हजार रुपये तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ मध्येच सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानभरपाईपोटी देणे आवश्यक असलेला १५०१ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी अजूनही शासनाकडून वितरणासाठी उपलब्ध झाला नाही.
त्यामुळे तीन महिने उलटूनही शासनाची जाहीर मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक विवंचनेत भर पडली आहे. रब्बीच पीक अजून हाती येणे बाकी आहे.
दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घेतल्या गेलेल्या सोयाबीन व कापसाच्या उत्पादनात घट दिसते आहे. शिवाय या पिकांच्या दरातूनही शेतकऱ्यांच्या हाती फार काही पडेल असे दिसत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा आहे.
जेथे १० ते १२ क्विंटल सोयाबीन व्हायचे तेथे ३ क्विंटल २७ किलो झालेय. कपाशी जेथे दहा क्विंटल किमान पिकायची तेथे तीनच क्विंटल झाली. तूर पार उबळून गेली. मोसंबीची ८० टक्के फळगळ झाली. शासनाने मदत जाहीर केली पण अजून पदरात पडली नाही.
- रावसाहेब किसनराव जाधव, नुकसानग्रस्त शेतकरी, जामखेड, ता. अंबड, जि. जालना.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.