कृषी खात्यात गैरव्यवहार होत असल्याची सीबीआयकडे तक्रार

सीबीआयने पुरावे मागितल्याचा दावा, कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीमुळे खळबळ
कृषी खात्यात गैरव्यवहार होत असल्याची सीबीआयकडे तक्रार
Agriculture DepartmentAgrowon

पुणे ः राज्याच्या कृषी विभागातील (Agriculture Department) अधिकाऱ्यांकडून योजना व बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार (Malpractice) होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलने सीबीआयकडे (CBI) केली आहे. याबाबत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत पुरावे सादर करण्याची सूचना केल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

कॉंग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी स्वतः सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जावून या गैरव्यवहाराबाबत तक्रार केली. याबाबत मुंडे म्हणाले की, ‘‘कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार पद्धतशीरपणे कसा सुरू आहे, याविषयी मी मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली आहे. हीच माहिती मी लेखी स्वरूपात ‘ईडी’ व ‘सीबीआय’ला कळवली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. गैरव्यवहाराशी संबंधित घटनाक्रम त्यांना सांगितला असून मला अधिकृत पुरावे सादर करण्यास सूचित केले आहे. या पुराव्यांचा अभ्यास करून कृषी खात्याकडून माहिती मागविण्यात येईल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.’’

कृषी विभागातील विविध घोटाळ्यांसंदर्भात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात यापूर्वीच तक्रारी झालेल्या होत्या. गैरव्यवहाराचे एक प्रकरण राज्याच्या लोकायुक्तांकडे आहे. दुसऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिलेला आहे. तिसऱ्या प्रकरणात कृषी आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. चौथ्या प्रकरणात ईडीने कृषी खात्याला यापूर्वीच नोटीस बजावून माहिती मागवली आहे. आता बदल्यांचे प्रकरण उद्भवल्याने कृषी खात्यातील सोनेरी टोळी हैराण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत दहा अधिकाऱ्यांची नावे नमुद करण्यात आलेली आहेत. यातील काही उच्चपदस्थ व मंत्रालयाशी संबंधित आहेत. बदल्या करताना कोणत्या पदाला किती रकमा आकारल्या जातात व त्यावर अंतिम निर्णय कोण घेतो याची माहिती तक्रारीत आहे. बदल्यांमधील गैरव्यवहार उघड होऊ नये यासाठी माहिती अधिकारात अर्ज केला असता तो नाकारण्यात आला, कृषी आयुक्तालयाचा आस्थापना विभाग, मंत्रालयातील काही अधिकारी तसेच १३ व्यक्तींकडून हा घोटाळा सुरू आहे, असेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

कृषी विद्यापीठांमधील बांधकामांमध्ये ५ टक्के कमिशन घेतले जातात, गुणनियंत्रण विभागातील परवान्यांमध्ये पैसे लाटणे सुरूच आहे, कृषी विभागातील अधिकारी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी स्थावर व जंगम मालमत्ता मिळवत असल्याचा आरोप सर्वे क्रमांकसहीत या तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रार केवळ आम्हाला बदनाम करण्यासाठी

कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआय किंवा ईडीकडून आमची थेट चौकशी कधीही होणार नाही. आधी राज्य शासनाला भूमिका मांडावी लागेल. ही तक्रार राजकीय स्वरूपाची आहे. मुळात, कोणताही निर्णय एकटा अधिकारी घेत नाही. त्यावर सनदी अधिकाऱ्यांसह मंत्र्यांच्याही स्वाक्षऱ्या असतात. सर्व निर्णय तसेच बदल्या कायदेशीर बाबींच्या कक्षेत राहून घेतले जातात. त्यामुळे केवळ आम्हाला बदनाम करून दबावापोटी काही साध्य करण्याचा हा डाव आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com