‘व्हॉटस्अॅप’वर स्वीकारली जाणार निविष्ठांची तक्रार

अडचणींचे कृषी आयुक्तालय करणार निराकरण
‘व्हॉटस्अॅप’वर स्वीकारली जाणार निविष्ठांची तक्रार
Kharif SeasonAgrowon

पुणे ः खरीप हंगामात खते, बियाणे (Seed) व कीडनाशकांच्या (Pesticide) उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण आल्यास राज्यातील शेतकरी थेट व्हॉटसअॅपवरुन तक्रार (WhatsApp Complaint) दाखल करू शकतात, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या (Commissionerate of Agriculture) सूत्रांनी दिली.

निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांच्या म्हणण्यानुसार, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी, लिंकिंगबाबत शेतकऱ्यांना अडचणी आल्यास कृषी आयुक्तालयाकडून निराकरण केले जाईल. थेट ‘व्हॉटसअॅप’वर आलेली तक्रारही स्वीकारली जाणार आहे. मात्र, तक्रार नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तक्रारीचा थोडक्यात तपशिल द्यावा लागणार आहे. साध्या कोऱ्या कागदावर ही माहिती लिहून त्याचे छायाचित्र काढून ते ‘व्हॉटसअॅप’ने पाठवता येऊ शकेल.

खरीप हंगामातील निविष्ठा पुरवठ्यातील विविध अडचणी सोडविण्यासाठी कृषी आयुक्तालयाने नियंत्रण कक्ष उघडला आहे. या कक्षात सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्यान शेतकरी संपर्क करू शकतात. राज्यातील शेतकरी संस्था तसेच निविष्ठांशी संबंधित विविध उत्पादक, वाहतूकदार, वितरक, विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी ऐकून घेण्याची जबाबदारीदेखील या कक्षाकडे देण्यात आलेली आहे. आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राज्यस्तरीय यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.

क्षेत्रिय पातळीवर ९ अधिकाऱ्यांची नजर
कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, मुख्य बियाणे निरीक्षक महेश झेंडे, वरिष्ठ अधिकारी किरण जाधव यांची नजर राज्यातील निविष्ठांच्या पुरवठा व गुणवत्ता नियंत्रणावर असेल. मात्र, याशिवाय क्षेत्रिय पातळीवर ९ अधिकारीदेखील निरीक्षक म्हणून लक्ष ठेवणार आहेत.

कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण), विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक याशिवाय कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, पंचायत समितीमधील कृषी अधिकारी आदी निरीक्षक क्षेत्रिय पातळीवर उपलब्ध आहेत.

बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, खत वाहतूक नियंत्रण आदेश १९७३, खत नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशके कायदा १९६८, कीटकनाशके नियम १९७१ आणि कीडनाशके नियंत्रण आदेश १९८६ अशा सात कायद्यातील तरतुदीनुसार कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

तक्रार दाखल करण्यासाठी अशी आहे यंत्रणा
- राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष ः भ्रमणध्वनी ८४४६११७५००, ८४४६२२१७५०, ८४४६३३१७५०
- टोल-फ्री क्रमांक ः १८००२३३४०००
- इ-मेल ः controlroom.qc.maharashtra@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com