‘पूर्वमोसमी’ला पोषक हवामान

उष्ण लाटेने विदर्भ होरपळत असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.
‘पूर्वमोसमी’ला पोषक हवामान
Monsoon UpdateAgrowon

पुणे : उष्ण लाटेने (Heat Wave) विदर्भ होरपळत असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला (Pre-Monsoon Rains) पोषक हवामान होत आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्ण लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, नागपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, अकोला, अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यातही उन्हाचा चटका कायम असून, उकाडा चांगलाच वाढत आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशापासून बांगलादेशापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आज (ता. ७) विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.४, धुळे ४१.०, जळगाव ४३.०, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर ३०.२, नाशिक ३६.८, निफाड ३७.२, सांगली ३५.९, सातारा ३८.१, सोलापूर ४१.८, सांताक्रूझ ३४.१, डहाणू ३४.५, रत्नागिरी ३३.८, औरंगाबाद ४१.२, परभणी ४३.३, नांदेड ४१.०, अकोला ४४.८, अमरावती ४४.२, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४६.२, चंद्रपूर ३५.४, गोंदिया ४६.२, नागपूर ४५.२, वर्धा ४५.०.

कोकणातील मॉन्सून आगमनाचा मुहूर्त टळणार

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. प्रवाह मंदावल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमनही लांबले आहे. साधारणतः ७ जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळणार आहे. यातच संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर या भागातही मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.

वादळी पावसाचा इशारा :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com