Glyphosate : ग्लायफोसेट तणनाशक विक्रीबाबत संभ्रम

विक्रीवर बंदी नसल्याचा ‘माफदा’च्या शिष्टमंडळाला कृषी आयुक्तालयाचा निर्वाळा
 Glyphosate
GlyphosateAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने ग्लायफोसेट (Glyphosate) या तणनाशकाच्या (Weediside) वापरावर निर्बंध लागू केल्यानंतर राज्यात विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेला माल विकायचा की नाही, या बाबत संभ्रम तयार झालेला आहे. या समस्येविषयी विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने कृषी आयुक्तालयात (Commissnarate Of Agriculture) आले असता ‘ग्लायफोसेट विक्रीवर कोणतीही बंदी नाही,’ असा निर्वाळा दिला गेला आहे.

 Glyphosate
Glyphosate Ban : ‘ग्लायफोसेट’वर निर्बंध

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक संरक्षण विभागाने ग्लायफोसेटच्या वापरावर मर्यादा घालणारी अधिसूचना २१ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार, फक्त मान्यताप्राप्त कीड नियंत्रक वापरकर्त्यांना (पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स) ग्लायफोसेटचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतीसाठी विविध कीडनाशके विकणारे विक्रेते किंवा विकत घेणाऱ्या ग्राहकांना ग्लायफोसेट उपलब्ध होणार नाही, असा अर्थ लावला गेला.
महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.२) कृषी आयुक्तालयात निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधले. निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांच्यासमोर ‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सरचिटणीस बिपिन कासलीवाल, कोशाध्यक्ष प्रकाश नवलाखा यांनी विक्रेत्यांच्या अडचणी उपस्थित केल्या. या बैठकीनंतर माफदाने एक निवेदन प्रसिद्ध केले. ‘‘ग्लायफोसेटवर कोणतेही निर्बंध नाहीत. विक्री चालू ठेवावी. अफवांवर विश्‍वास ठेवू नये,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.

 Glyphosate
Glyphosate Ban: ग्लायफोसेट बंदीमागचे अमेरिकन कनेक्शन माहित आहे का?

दरम्यान, कीडनाशके निर्मिती उद्योग क्षेत्रातील एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, केंद्राने स्पष्टपणे ग्लायफोसेटवर निर्बंध लादल्याचे नमूद केले आहे. तसेच अमान्यताप्राप्त व्यक्ती किंवा यंत्रणेकडून या तणनाशकाचा वापर झाल्यास कारवाईची तरतूददेखील सांगितली आहे. एक तर राज्य शासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी किंवा केंद्रापुढे आपली भूमिका मांडून सदर निर्बंध सरसकट मागे घेण्यास भाग पाडायला हवे. कोणत्याही विक्रेत्याला यापुढे पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स व्यतिरिक्त ग्लायफोसेट विकता येणार नाही. विक्रीच्या नोंदीही नोंदीपणे ठेवाव्या लागतील. त्यामुळे या निर्णयाचे सोयीसोयीने अर्थ काढल्यास विक्रेते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात.

निर्बंध वापरावर; विक्रीवर नव्हे
कृषी खात्याने ग्लायफोसेटच्या निर्णयासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकाबाबत निरीक्षकांमध्येही संभ्रमाची स्थिती आहे. ‘‘पेस्ट कंट्रोल ऑपरेटर्स ग्लायफोसेटचा वापर करू शकतात, असे केंद्राने नमूद केले आहे. मात्र त्याची विक्री करू नये, असा उल्लेख अधिसूचनेत केलेला नाही. त्यामुळे राज्यात ग्लायफोसेटच्या वापरावर निर्बंध असून विक्री रोखण्यात आलेली नाही,’’ असे या परिपत्रकात नमूद केले आहे. परंतु विक्रीला परवानगी असल्याचा उल्लेख परिपत्रकात नसल्याने संभ्रम कायम आहे, असे विक्रेत्यांच्या गोटातून सांगण्यात आले.


काळजीपूर्वक वापर करावा ः झेंडे
‘‘राज्यभर ग्लायफोसेट उपलब्ध आहे. कोठेही विक्रीवर बंदी आणलेली नाही. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होणार नाही, या बाबत आम्ही निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत. मात्र या तणनाशकाचा वापर काळजीपूर्वक करावा. अतिपावसामुळे तणाची समस्या यंदा राज्यभर उद्‍भवलेली आहे. त्यामुळे प्रभावी तणनाशक वापरल्याशिवाय रब्बी हंगामाचे नियोजन करता येणार नाही. तणनाशकाच्या विक्रीत कोठेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे,’’ असे कृषी संचालक दिलीप झेंडे (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com