
अकोला ः अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akot APMC) गेल्या ६ डिसेंबरपासून कापूस खरेदी (Cotton Procurement) बंद ठप्प पडलेली आहे. यावर जिल्हा उपनिबंधकांनी तोडगा काढला असून व्यापारी व प्रशासकांमधील वाद निपटल्याचे सांगितले जाते. यानंतर आता गुरुवार (ता.१५) पासून येथील कापूस खरेदी पूर्ववत जोमाने सुरू होईल, असे सांगितले जात आहे.
विक्रीसाठी आलेल्या कापसाची नोंद बाजार समितीच्या काटापट्टीवर करण्याच्या कारणाने बाजार समिती प्रशासक व व्यापाऱ्यांमध्ये मतभेद झाले होते. बाजार समिती काटापट्टीवर नोंद घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हर्राशी सोडून खरेदी बंद केली. जवळपास आठ दिवस अकोट बाजारातील कापूस खरेदी ठप्प आहे.
या विषयाला धरून बाजार समिती प्रशासक तसेच व्यापाऱ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या होत्या. दोन्ही बाजूंकडून प्रश्न मिटण्याची चिन्हे दिसत नव्हती. व्यापाऱ्यांनी मुख्य प्रशासकांवरच आरोप केले होते. दुसरीकडे बाजार समिती प्रशासकांनीही २० व्यापाऱ्यांचे खरेदी परवाने १५ दिवसांसाठी निलंबित करून आपल्या अधिकारांचा वापर कसा होऊ शकतो हे व्यापाऱ्यांना दाखवून दिले.
दिवसेंदिवस हा प्रकार चिघळत चालल्याने शेतकऱ्यांची गोची वाढली होती. बाजार समितीतील खरेदी बंद पडल्याने दुसरीकडे खेडोपाडी व्यापारी कापसाची कमी दराने कापसाची मागणी करू लागले होते. आठ हजारांपर्यंत दर खाली आणण्यात आला. अखेरीस यामध्ये जिल्हा उपनिबंधकांनी मध्यस्थी करीत कायदेशीर बाबीं तपासल्या. काटापट्टीवर हलका कापूस अशी नोंद करणे कायदेशीर योग्य नाही, हे स्पष्ट केले. इतर विषयांवरही सामंजस्याने तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. अखेरीस या वादावर पडदा पडला असून आता गुरुवारपासून खरेदी सुरू होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.