Farmers Son Marriage
Farmers Son MarriageAgrowon

Farmer Son Marriage : अनावश्‍यक खर्च टाळत रजिस्टर लग्नातून ठेवला आदर्श

Indian Marriage Culture : आजही ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंबे मुला-मुलींच्या लग्नाच्या खर्चाने आणि कर्जाच्या ओझ्याने दबलेली आहेत...

Solapur News : लग्न हा सध्या मोठेपणा मिरवण्याचा, ईर्षेचा बाजार झाला आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी नुसती चढा-ओढ सुरू आहे. आजही ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंबे मुला-मुलींच्या लग्नाच्या खर्चाने आणि कर्जाच्या ओझ्याने दबलेली आहेत...

याच ईर्षेला, अहंकाराला बगल देत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील तरुण वकील अॅड. श्रीरंग दत्तात्रय लाळे आणि कृषी पदवीधर असणाऱ्या पूजा कल्याण मांडवे या दोघांनी लग्न केलं आणि तेही रजिस्टर लग्न केलंय.

दोघांचेही आई-वडील शेतकरी आहेत, शेतकरी कुटुंबातून आल्याने शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा आणि कष्टाची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच आपण हे लग्न रजिस्टर का केलं?

या बाबतचा त्यांचा संदेश आजच्या अविवाहित तरुणांच्या आणि कुटुंबाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा ठरला आहे. लग्न ठरलंय आणि रजिस्टर केलंय, याबाबत श्रीरंग लाळे यांनी सध्या सोशल मीडियावर मांडलेले विचार चांगलेच चर्चेचे ठरत आहे.

Farmers Son Marriage
Farmer Issues : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत

लग्न ठरलंय आणि रजिस्टर केलंय!

ॲड. लाळे लिहितात की, मित्र-मैत्रिणींनो आणि नवरा-नवरीच्या आई-बापांनो, लग्न हे ईर्षा करण्याचे मैदान नाही किंवा संपत्ती व मोठेपणा मिरवण्यासाठीचा एकमेव मार्ग नाही. तसेच भोगल्याशिवाय पर्याय नाही, अशी कोणतीही शिक्षा नाही. मोठेपणा मिरविण्याच्या ईर्षेपोटी आणि पै- पाहुण्यांच्या ‘बिनकामाच्या पोकळ’ आग्रहापोटीच कित्येक पोरींच्या बापांनी आत्महत्या केल्या,

तर कित्येक कुटुंबे तोळ-अर्ध्या तोळ्याच्या पै-पाहुण्यांच्या ईर्षेच्या, अहंकाराच्या वादात देशोधडीला लागलेली मी स्वतः समाजात आणि कोर्टात बघितली आहेत आणि बघतोच आहे. आता मात्र या लग्न विषयावर विचार करावाच लागेल.

मी कोर्टात वकिली करत असताना लग्नातल्या अंदाधुंद खर्चाने लग्नानंतर आलेल्या पैशाच्या अडचणीतून भांडणे सुरू झाल्याने कुटुंबाकुटुंबात आणि नवरा-बायकोत होणारी भांडणे विकोपाला गेलेली आणि त्याचा शेवट घर फुटण्यात आणि सोडचिठ्ठी झाल्यात स्वतः बघितली आहेत.

अंधश्रद्धेला मुठमाती...

कोणी स्पष्टपणे बोलेल की नाही मला माहीत नाही. पण मला मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगावे वाटते की, कोणतेही लग्न हे लग्नातील विधी केल्याच्या कारणावरून यशस्वी होत नाही आणि लग्नात विधी न केल्याच्या कारणावरून तुटतही नाही. पत्रिका आणि आकाशातील ग्रहताऱ्यांवरून कोणाचेही भविष्य ठरत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. नाही तर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेच आहे की...

Farmers Son Marriage
Farmers Issue : शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाचा योग कधी?

वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा,

येरांनी वहावा भारमाथा !

अनेक कुटुंबे आर्थिक गर्तेत...

विशेष बाब अशी की, एखादा अपवाद वगळता ‘धूमधडाक्यात मोठं लग्न करा..’ असे म्हणणारा कोणताही पाहुणा, भावकी किंवा मित्र-मैत्रीण लग्नानंतरच्या आर्थिक अडचणीत मदत करून साथ देत नाहीत. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, त्यांचं एकवेळ ठीक पण इतर कुटुंबांचे काय? लग्नघराची दोन्ही कुटुंबे पुढील ५-१० वर्षांसाठी थेट आर्थिक गर्तेत जातात, हे आपण डोळ्याने बघतोय. आपण नेमके असे अंदाधुंद होऊन कोणत्या दिशेने चाललो आहोत आणि का, याचा विचार होणे आवश्यक आहे.

आर्थिक लक्ष्मण रेषा ओळखा...

‘लग्न आयुष्यात एकदाच होते, मरताना पैसे वर घेऊन जायचे आहेत का, हौस एकदाच असते, तुझ्या भावकीत किती मोठी लग्न झाली. मग आपण पण मोठं करून दाखवू...’ ही वाक्ये सर्रास तुम्ही-आम्ही ऐकतो आहोत. पण या जीवावर बेतनाऱ्या मोहजालात न अडकता आर्थिक शहाणपणाची लक्ष्मण रेषा ओलांडणे, ही आताची काळाची गरज आहे.

तो खर्च टाळला तर शेतीच्या, शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या कितीतरी तरतुदी होऊ शकतात. तुमचे लग्न शांततेत आणि कमी खर्चात झाले, तरी मला काही नफा - तोटा नाही पण तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर पुढील परिस्थिती आहे.

बुडती हे जन, न देखवे डोळा!

म्हणून कळवळा येत असे!!

सामाजिक दृष्टिकोन बदलावा...

पळून जाऊन करतात तीच लग्नं फक्त रजिस्टर पद्धतीने होतात ही विचारधारा पण बदलायची आहे. माझ्या या लिखाणाचा आणि कृतीचा अनेक गरजूंना फायदा व्हावा हीच अपेक्षा! हे टाळता येणे शक्य आहे, मी स्वतः रजिस्टर लग्नाचे प्रयत्नात यशस्वी झालो आहे; तुम्हीही नक्की होऊ शकता आणि ही अशी चळवळ झाली पाहिजे कारण ही आर्थिक दृष्टीने सक्षम आणि सुखी वैवाहिक कुटुंबाची चावी आहे.

त्यात दोन्ही कुटुंबाकडून आणि विशेषतः दोन्ही बाजूंच्या आई - वडिलांकडून तार्किक विवेकाने विचार करून भूमिका घेण्याची गरज आहे. माझ्या कुटुंबाकडून आणि पूजा व तिच्या कुटुंबाकडून घेण्यात आलेल्या रास्त भूमिकेबद्दल सर्वांचा आभारी आहे. चला आपण अनावश्यक खर्च टाळून रजिस्टर लग्नाची नवीन चळवळ सुरू करू! बाकी आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या आणि पूजाच्या भावी वैवाहिक आयुष्याचे सोबत आहेतच असे गृहीत धरतो, धन्यवाद!

- ॲड. श्रीरंग लाळे, मोहोळ, मोबाईल- ९४२१९०९०८८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com