गोधन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे माध्यम

सकाळ-अॅग्रोवन व महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गोधन -२०२२’ प्रदर्शन व प्रात्यक्षिकांचे शानदार उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.
गोधन शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे माध्यम
Ajit PawarAgrowon

पुणे ः स्वार्थासाठी गोवंशाचा (Gowansh) मुद्दा राजकीय बनवला जाऊ नये. उलट, गोधन (Cattle) हे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

सकाळ-अॅग्रोवन व महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गोधन -२०२२’ प्रदर्शन (Godhan Exhibition) व प्रात्यक्षिकांचे शानदार उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर आ. अशोक पवार, आ. नरेंद्र दराडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय पानसरे व दत्तात्रय उगले, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, गोवंश संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ माने व इतर शास्त्रज्ञ होते.

देशातील जातिवंत तसेच दुर्मिळ दुधाळ गोवंश (Milch Cow) एकाच ठिकाणी पाहण्याची संधी ‘गोधन’मुळे मिळते आहे. या प्रदर्शनाचे सहप्रायोजक ‘कन्हैया अॅग्रो’, ‘चितळे डेअरी’ व ‘बारामती अॅग्रो’ आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत बारकाईने या प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच, गोपालन व गोवंश संशोधनाविषयी विविध प्रश्न विचारत सूचनाही केल्या.

श्री.पवार म्हणाले की, ‘‘गोवंशाचा मुद्दा हा राजकारणाचा ठरू नये. भारतीय जीवन पद्धतीत शेती ही गोधनाच्या मदतीने बहरली आहे. त्यामुळे शेतकरी गोवंशासाठी कृतज्ञ व हळवा असतो. आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने बारकावे माहीत आहेत. देशी गायीचे गोठे आम्ही सांभाळले, धारा काढल्या, चांगल्या देशी गायींसाठी आम्ही परराज्यात हिंडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशी गायींचे महत्त्व जाणतो. त्या जतन केल्या पाहिजे. राज्यात भौगोलिक स्थितीनुसार विविध गोवंश आहेत. त्याचे संवर्धन झाले पाहिजे. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या या ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’चे नाव आदराने घेतले जाते. मात्र, येथील गोठ्यांमध्ये अजून सुधारणा करावी. आर्थिक मदतीकरिता राज्य सरकार तुमच्या पाठीशी असेल.’’

‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले की, ‘‘गोवंश संवर्धन चळवळीत ‘सकाळ-अॅग्रोवन’ १५ वर्षांपासून काम करतो आहे. एटू-मिल्क तसेच सेंद्रिय शेतीतील पदार्थांना मागणी वाढते आहे. ही चळवळ आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. मात्र, यात आता हवशे-गवशे -नवशे जमा होत असल्याने चळवळ बदनाम होते आहे. ती शुद्ध करण्यासाठी कृषी विद्यापीठे व शासनाला पुढाकार घ्यावा लागेल.’’
कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी, ‘‘देशी गोवंशविषयक माहिती, मूल्यवर्धन व प्रात्यक्षिके एकाच ठिकाणी सादर करणारे देशातील हे पहिलेच संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राच्या उभारणीत खूप अडचणी आल्या. मात्र, आमचे शास्त्रज्ञ यापुढेही चिकाटीने संशोधन सुरू ठेवतील,’’ असा आत्मविश्वास कुलगुरुंनी व्यक्त केला.


‘अॅग्रोवन’ पोहोचवतोय शेतकऱ्यांच्या यशोगाथा
‘अॅग्रोवन’चा विशेष उल्लेख करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, ‘‘प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्यभर पोहचविण्याची जबाबदारी ‘अॅग्रोवन’ने काही वर्षांपासून उचलली आहे. पेरणीपासून शेतीमधील सर्व माहिती ‘अॅग्रोवन’ बारकाईने देतो आहे. ‘अॅग्रोवन’ व कृषी विद्यापीठ अशा दोन्ही संस्थांनी एकत्र येत भरवलेले हे प्रदर्शन राज्यातील गोपालक तसेच दूध उत्पादकांच्या समृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावेल. अशी प्रदर्शने राज्यभर झाली पाहिजे. त्यासाठी सरकार पाठबळ देईल.’’

उपमुख्यमंत्री काय म्हणाले...
- देशी गोवंशाच्या गोमूत्र, तूप, दूध उत्पादनाला मागणी आहे. आरोग्यास ते उपयुक्त असल्याने त्यासाठी जास्त पैसे दिले तरी चालतील.
- आधुनिक शेती, गोठे पाहण्यासाठी बारामतीला या. त्यासाठी पवार साहेबांनी दिलेले योगदान मोठे आहे.
- प्रदर्शनातील सहभागी कृषी शिक्षण घेणाऱ्या मुलींशी मी चर्चा केली. त्या ९८ टक्के, ९९ टक्के गूण मिळवत आहेत. आमचे दोन वर्षांचे गूण एकत्र केले तरी होत नव्हते (हशा); पण या गुणवंत मुलींमुळेच महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य घडते आहे.
- ऊसतोडीसाठी मजुरांची नवी पिढी काम करायला तयार नाही. ते योग्यच आहे. आता त्यांनी शिकून उद्योग व्यवसायाकडे वळायला हवे.
- दुधाचे दर कमीजास्त होत असल्याने पशुपालकांची आर्थिक गणित बिघडते. सरकार त्यात हस्तक्षेप करुन मदतीची भूमिका पार पाडते आहे.

चौकट ---
प्रदर्शन उद्यापर्यंत सर्वांसाठी खुले
पुण्यातील वाकडेवाडी (शिवाजीनगर) येथील नवीन एसटी बसस्थानकासमोरील कृषी महाविद्यालयाच्या ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’त शुक्रवार (ता. २७) पासून सुरू झालेले ‘गोधन’ प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. गोवंश, गोपालनाची माहिती व प्रात्यक्षिके असणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, लाल सिंधी, राठी, गीर या देशी दुधाळ गोवंशाबरोबरच राज्यातील खिलार, देवणी, लालकंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे गोवंश बघण्याची संधी शेतकऱ्यांबरोबरच शहरी नागरिकांना मिळाली आहे. हे प्रदर्शन उद्यापर्यंत (ता. २९) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी मोफत खुले राहील.

चौकट ---
प्रदर्शनातील चर्चासत्रे
शनिवारी (ता. २८) ः
१) सकाळी ११ वाजता राजस्थानमधील अभ्यासू पशुपालक संपत भार्गव यांचे अनुभवकथन. २) दुपारी तीन वाजता गुलाबराव यादव यांचे ‘गोपालन, गोमय वस्तूंचे उत्पादन’ या संबंधी अनुभवकथन.

रविवारी (ता. २९) ः
१) सकाळी ११ वाजता शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांचे देशी गोवंशासाठी पोषणाचे तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन.
२) दुपारी बारा वाजता डॉ. धीरज कणखरे यांचे ‘दुग्धप्रक्रिया तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन.
३) दुपारी अडीच वाजता डॉ. नितीन मार्कंडेय यांचे ‘देशी गोवंशाची जातिवंत पैदास’ विषयावर व्याख्यान.

फोटो ओळी ---
फाईल आयडी : PNE22S67045
पुणे : सकाळ-अॅग्रोवन व महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘गोधन -२०२२’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार. समवेत डावीकडून अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, आ. नरेंद्र दराडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, गोवंश संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ माने, उपमुख्यमंत्री श्री. पवार, ॲग्रोवनचे संचालक संपादक आदिनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com