बियाणे विक्रेत्याच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यावर खंडणीचा गुन्हा

विक्रेत्याची पोलिसात धाव; आवाज दाबत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप
बियाणे विक्रेत्याच्या तक्रारीमुळे शेतकऱ्यावर खंडणीचा गुन्हा
SeedAgrowon

नाशिक : निफाड तालुक्यातील सायखेडा येथील सोनवणे कृषी उद्योगाचे संचालक भाऊसाहेब सोनवणे यांनी करंजगाव येथील शेतकरी शिवाजी राजोळे यांना २८ मे रोजी घेवडा व भोपळा बियाणे (Gourd Seed) विकले. मात्र, त्यातील घेवडा बियाणे मुदतबाह्य होते. हा प्रकार शेतकऱ्याचा मुलगा राम राजोळे यांनी विक्रेत्याच्या लक्षात आणून दिला; मात्र कृषी विभागाकडे (Agriculture Department) तक्रार करणार नाही या बदल्यात राम याने माझ्याकडून खंडणी (Ransom) मागितल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. या प्रकरणी त्यांनी ३० मे रोजी सायखेडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिल्यानंतर शुक्रवारी (ता. ३) गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सोनवणे यांनी बियाणे विक्री करताना पक्के बिले न देता कोटेशन पावती बनवून हे बियाणे दिल्याचे समोर आले आहे. त्यातच दिलेले सॅम्पल बियाणे मुदतबाह्य निघाल्याने बोगस बियाणे वितरणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राम याने मला करंजगाव येथील पगार मळ्यात बोलावून, मी कृषी विभागात तक्रार करणार नाही, या बदल्यात दहा गोण्या सोयाबीन बियाणे व दोन लाख रुपयांची मागणी केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

राजोळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की मुदतबाह्य घेवडा बियाणे दिल्यानंतर सोनवणे यांना कळविले. त्यांनी यावर उडवाउडवीचे उत्तर दिले. या प्रकरणाबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतर बदनामीकारक रेकॉर्डिंगचा काही भाग व्हॉट्सअॅपवर शेअर करून हे षड्‌यंत्र रचले आहे. मी खंडणी मागितली असा चर्चेचा कोणताही पुरावा नसताना माझी बदनामी केली. राम हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निफाड तालुकाध्यक्ष आहे, मात्र संघटनेची बदनामी नको म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्याकडे तूर्तास राजीनामा दिला आहे.

गंभीर मुद्दे आले समोर

कोटेशन पावतीवर मुदतबाह्य सॅम्पल बियाणे दिल्याने कृषी विभागाने संबंधित विक्रेत्याला नोटीस देऊन खुलासा मागवला आहे. बियाणे सॅम्पल दिले मग त्याची कोटेशन पावती का दिली? विकलेल्या बियाण्याची पक्की पावती का दिली नाही, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. याशिवाय कथित रेकॉर्डिंग व पोलिस तक्रारीत मुदतबाह्य बियाणे नजरचुकीने दिल्याची कबुली स्वतः विक्रेत्याने दिली आहे. मात्र विक्रेत्याच्या तक्रार अर्जावरून राजोळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे खंडणी प्रकरण तर दुसरीकडे मुदतबाह्य बियाणे वितरण असे दोन्ही गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे खंडणी मागितल्याचे ठोस पुरावे या प्रकरणात महत्त्वाचे ठरणार आहेत.

जुन्या व्यवहारातील राग धरून राजोळे यांनी कृषी विभागाकडे सॅम्पल दिलेले बियाणे सादर करून तक्रारी केल्या. नंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी खंडणी मागितली.
भाऊसाहेब सोनवणे, संचालक, सोनवणे कृषी उद्योग
मी पैशांची मागणी केली नसून जाणीवपूर्वक बनाव आहे. त्यांनी खंडणी मागितल्याचे पुरावे सादर करावेत. मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. शेतकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.
राम राजोळे, शेतकरी
राजू शेट्टी यांनी रस्त्यावर रक्त सांडून संघटना उभी केली आहे. संघटनेने शेतकऱ्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे आमचा पदाधिकारी चुकला असेल तर कारवाई व्हावी; मात्र बिनबुडाचे व तथ्य नसताना संघटनेला धरून आरोप नको.
संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com