मराठवाड्यात पाऊस लांबल्याने पिकांवर संकट

एक लाख हेक्‍टरवर खरीप पेरणी; पिकांना पाण्याची नितांत गरज
मराठवाड्यात पाऊस लांबल्याने पिकांवर संकट
Rain UpdateAgrowon

औरंगाबाद : अजून मॉन्सून (Monsoon) सर्वदूर सक्रिय झाल्याची चिन्हे दिसत नसताना उपलब्ध पाणी तसेच आजवर झालेल्या पावसाच्या भरोशावर मराठवाड्यात जवळपास १ लाख ८ हजार ५९९ हेक्टरवर खरिपाची पेरणी (Kharif Sowing) झाली आहे.पेरणी झालेल्या अनेक भागांत आता पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने पिकांना पाण्याची (Water For Agriculture) नितांत गरज भासते आहे.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात सर्वाधिक २९ हजार ९३ हेक्टरवर तर त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात २७ हजार ८३१ हेक्टर, औरंगाबाद जिल्ह्यात २० हजार ८२८ हेक्टर, बीड १६ हजार ४३६ हेक्टर, परभणी ११०६३ हेक्टर, उस्मानाबाद ३२५८ हेक्टर तर लातूर जिल्ह्यात केवळ ९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी उरकली आहे. हिंगोली जिल्ह्यात अजून दखलपात्र पेरणी सुरू झाली नसल्याची स्थिती आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक कपाशीची लागवड करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य आदी पिकांची ही कमी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १३ हजार ८९३ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. गंगापूर तालुक्यात ३०२२ सोयगाव २४७६ हेक्टरवर खरीप पेरणी उरकली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक १३ हजार ७४० हेक्‍टरवर कपाशी तर ५ हजार ७६२ हेक्टरवर मका लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. जालना जिल्ह्यात एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तब्बल २६ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. भोकरदन बदनापूर, जाफराबाद आदी तालुक्यांत पेरणी पुढे असून त्यापाठोपाठ घनसावंगी, अंबड आदी तालुक्यांत २ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात सर्वाधिक ७ हजार ९४ हेक्टरवर तर आष्टी तालुक्यात ३८५० हेक्टरवर, गेवराई २६३४, परळी १७४८ हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली आहे. इतर तालुक्यांत १०० ते ३०० हेक्टर दरम्यान पेरणी उरकली असून केज आणि पाटोदा तालुक्यात अजून पेरणी सुरू झाली नसल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

पावसाचा लहरीपणा मुळावर

हवामान विभागाचा अंदाजानुसार, मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापल्याचे दिसत असले तरी मराठवाड्यातील काही भाग अपवाद वगळता पेरणीयोग्य पाऊस झालाच नसल्याची स्थिती आहे. ढगांची गर्दी मात्र पावसाची दांडी असेच चित्र बहुतांश भागात असून पावसाचा लहरीपणा व लांबणीवर पडणे पिकांच्या मुळावर संकट घेऊन आले आहे.

अल्पपावसाने पिकांची उगवण झाली. पण जोराचा पाऊस पाहिजे होता तो पडलाच नाही. असे दहा पंधरा दिवसांपासून सुरू आहे. आज पाऊस पडला. मात्र, सरी कमी अन् गडगडाट जास्त होता. यामुळे जिवंत कोंबाना जीवदान मिळणार आहे.

- चंद्रकात वाघ, वालसा, जि. जालना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com