
Mumbai News : दोन हजार रुपयांच्या नोटा छापून काळा पैसा बाहेर काढायचा होता तर तो बाहेर पडण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत का दिली, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी (ता. २३) केला.
दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीवरून पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोठे आर्थिक व्यवहार करणाऱ्यांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असतात. गेल्या दोन वर्षांपासून व्यवहारात दोन हजार रुपयांच्या नोटाही नव्हत्या. मग आताच का हा निर्णय घेतला, असा सवालही त्यांनी केला.
पवार म्हणाले, की १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा चालतील, असे सांगण्यात आले. खरेतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे नाहीत.
पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले, त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाल्या. त्याच पद्धतीने करता आले असते आणि त्यातून काळा पैसा हा चलनामध्ये फिरतोय तो फिरण्यापासून वाचवता आला असता.
नोटबंदीच्यावेळी रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र शंका म्हणून दोन हजारांची नोट त्याचदिवशी बंद करायला हवी होती. नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देणे म्हणजे कमी दिवस नाहीत, असेही ते म्हणाले.
‘मलिक यांची भूमिका योग्यच’
समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, की आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या करारनाम्यावर स्पष्टपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्या वेळी नवाब मलिक यांना खोटे ठरवण्याचा किंवा ते जाणीवपूर्वक करत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, त्याच आरोपांची चौकशी आज सीबीआय करतेय. ते अधिकारी फार स्वच्छ आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता मात्र ‘सीबीआय’नेच सत्य लोकांसमोर आणले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.