Crop Damage : सोलापूर जिल्ह्यात उरलीसुरली पिकेही गेली पाण्यात

पावसाचा पुन्हा चाळीस हजार हेक्टरला फटका
Crop Damage
Crop DamageAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्यात ऑगस्टमध्ये खरीप पिकांचे मोठे ( Crop Damage) नुकसान झालेच, पण आता पुन्हा एकदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्याने होणाऱ्या पावसामुळे उरल्यासुरल्या खरीप पिकांचेही नुकसान केले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३९ हजार ८२८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस होतो आहे. यंदा जून आणि जुलैमध्ये पावसाने विश्रांती घेतली. पण ऑगस्टपासून मात्र थांबून-थांबून त्याचा जोर सुरुच आहे. सततच्या या पावसामुळे तूर, सोयाबीन, मूग, उडीद ही खरीप पिके, डाळिंब, आंबा, द्राक्ष या फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. आता सलग दुसऱ्या महिन्यातही नुकसानीमध्ये वरचेवर भरच पडत आहे. आता थोडेफार हातात येणारी उरलीसुरली पिकेही हातची गेली आहेत.

Crop Damage
Crop Damage:राज्यात पीक नुकसान १५ लाख हेक्टरच्या पुढे

कृषी विभागाच्या अहवालानुसार, दोन ते नऊ सप्टेंबर या कालावधीत बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या पाच तालुक्यांतील ८० गावांतील ४७ हजार ४८१ शेतकऱ्यांचे ३९ हजार ८२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यात दक्षिण सोलापुरातील आठ गावांतील १६२४ हेक्टर, करमाळ्यातील सात हेक्टर, बार्शी तालुक्यातील १० हजार ३१४ हेक्टर, उत्तर सोलापुरातील ८२८१ हेक्टर आणि सर्वाधिक अक्कलकोट तालुक्यातील १९ हजार ६०१ हेक्टरचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील २८ हजार ५६ शेतकऱ्यांच्या २५ हजार ९९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होऊन त्यांच्या मदतीसाठी सुमारे ४० कोटी ५६ लाख रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आला आहे. पण ही मदत अद्यापही मिळालेली नाही. तोवरच नुकसानीची व्याप्ती आणखी वाढली आहे. त्यामुळे शासनाची मदत केव्हा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

पंचनाम्याचा नाही पत्ता

कृषी खात्याने नुकसानीची नजर अंदाज आकडेवारी कळवत प्राथमिक नुकसानीचा अहवाल तयार केला असला, तरी प्रत्यक्षात नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या आदेशाने होतात. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश व्हायला हवेत. पण ते अद्यापही निघालेले नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com