
Pune News : राज्यात सुरू असलेले वादळी पाऊस, गारपिटीचे सत्र सुरूच आहे. नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांत शनिवारी (ता. १५) गारपिटीने तडाखा दिला. पाऊस आणि गारपिटीने उरल्या-सुरल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, मका, करवंदे, आंबे, हिरडा, हरभरा, कलिंगड पिकांसह भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.
नगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने झोडपले. सावेडी, केडगाव उपनगरांत गारांसह पाऊस कोसळला. त्यामुळे कांदा, गहू, त्याचबरोबर इतर पिकांचे नुकसान झाले.
अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील निंब्रळ येथे वीज पडून चार शेळ्या दगावल्या. भीमा खोऱ्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी (ता. १५) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, मका, अशा विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले.
सातारा जिल्ह्यात गारपिटीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सांयकाळी माण, खटाव, खंडाळा तालुक्यांत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा, आंबा, कडबा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव, बुध सह परिसरात सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला. खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या असवली, कण्हेरी, जवळे परिसरातील गावांना गारांसह पावसाने झोडपले. आंबा या फळबागांसह कांदा या पिकांचे नुकसान होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, हवेली, इंदापूर, दौंड, आंबेगाव, भोर, वेल्हा, मुळशी या भागांत जोरदार वाऱ्यासह व ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. हवेलीतील कात्रज, आंबेगावमधील मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, जांभोरी अशा अनेक ठिकाणी गारपिटीने दणका दिला.
हवेली तालुक्यासह पुणे शहर व उपनगरात जोरदार सरी कोसळल्या.आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात तुफान गारपिटीमुळे करवंदे, आंबे, हिरडा पिकांचे नुकसान झाले. मका, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, कांदा, तरकारी पिकांना फटका बसला.
सर्वाधिक फटका नाशिकला
नाशिक जिल्ह्यात मागील सप्ताहात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने हाहाकार झाला. शनिवारी (ता.१५) पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपिटीने जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे सिन्नर, दिंडोरी, सटाणा, मालेगाव, इगतपुरी, निफाड, नाशिक तालुक्यातील उरली-सुरली पिकेही हातची गेली. काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, कलिंगड, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले.
...असे झाले नुकसान
- नाशिक जिल्हा गारपिटीने कोलमडला
- नगर जिल्ह्यात वीज कोसळून शेळ्या दगावल्या
- भीमा खोऱ्यात गारपिटीचा तडाखा
- माण, खटावमध्ये गारांमुळे पिकांचे नुकसान
- पुण्यात गारपिटीने पिकांची दाणादाण
- परभणी शहर, तालुक्यातही दणका
रविवारी (ता. १६) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटर मध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
मध्य महाराष्ट्र : सातारा, सटाणा, बागलाण, सासवड, महाबळेश्वर, नाशिक प्रत्येकी १०.
विदर्भ : बुलडाणा ३०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.