
Nashik News गेल्या तीन दिवसांपासून अस्मानी संकटांच्या (Natural Calamity) तडाख्यात जिल्ह्यातील शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. त्यातच जिल्ह्यात रविवारी (ता. ९) संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने (Hailstorm) देवळा, नांदगाव, सिन्नर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी व निफाड तालुक्याला मोठा तडाखा दिला आहे.
शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्यामध्ये काढणीस असलेल्या उन्हाळ कांद्यासह द्राक्ष, आंबा, टॉमॅटो, भाजीपाला पिकांसह भाजीपाला रोपवाटीका व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात संध्याकाळी ७ वाजता जोरदार वादळी वारा अन् मेघगर्जनेसह तब्बल तासभर झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
तासभर झालेल्या मुसळधारेने इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेणीत, साकुर, नांदगाव बु,, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा, कवडदरा, धामणी, धामणगाव, बेलगाव तऱ्हाळे, वंजारवाडी आदी गावांतील परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा तसेच टोमॅटो, वांगी, काकडी, भेंडी, मका आदींसह बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतात काढणी करून पोळ लावून ठेवलेला हरभरा, काढणीसाठी आलेला गहू, कांदा पीक गारपिटीने अक्षरशः झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. शेतात अर्ध्या फुटांवर गारांचा खच साचला होता.
तासभर झालेल्या गारांच्या माऱ्यामुळे झाडाला फुले, फळ सोडा तर अक्षरशः पाने सुद्धा शिल्लक राहिली नाहीत.
सिन्नर तालुक्याचा उत्तर पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व गारपीट झाल्याने कांदा, भाजीपाला व झेंडू पिकाचे नुकसान आहे.
चांदवड तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागात गारा व पाऊस झाल्यानेकांदा पिकासह मिरची, टोमॅटो, कलिंगड पिकांसह कांदा बीजोत्पादन क्षेत्राचे नांदगांव तालुक्यांच्या पूर्व भागात जातेगाव, बोलठाण, जळगाव परिसरात गारांच्या तडाख्यात कांद्याची हिरविगार पात तुटून पडली.
देवळा तालुक्यात पावसासह कांदा, गहू, कांदा बीजोत्पादन डेंगळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. देवळा तालुक्यातील चिंचवे, कुंभार्डे तर कळवण तालुक्यांतील निवाने परीसर अडचणीत सापडला आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी, खेरवाडी येथे द्राक्षबाग भूईसपाट झाली तर गोदाकाठ परिसरात कांदा, गहु पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे.
अस्मानीचा मोठा फटका...
- सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरामधील जायगाव ब्राह्मणवाडे वडझिरे आणि परिसरात घरे शेड, शेडनेट, पोल्ट्री फार्म, घरे, जनावरांची शेड पडली.
- शेणीत येथे भाजीपाला रोपवाटीकाचे नुकसान
- गारपिटीमुळे भाजीपाला पिकांची दाणादाण
- सिन्नर, दिंडोरी, नाशिक परिसरात फुलशेती बाधित
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.