
Nanded News नांदेड : जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह गारपिटीमुळे (Hailstorm) मुदखेड, अर्धापूर, नांदेड व लोहा तालुक्यातील चार हजार ७९४ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायती व फळपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
यासोबतच लहान-मोठी १४ जनावरे वीज पडून मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासनाने नुकसानीबाबत सरकारकडे माहिती पाठविल्याची माहिती सूत्रानी दिली.
जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. अशातच हवामान खात्याने अवेळी पावसाचा इशारा दिला होता. यादरम्यान जिल्ह्यात बुधवारी तसेच गुरुवारी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन तुफान वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. यावेळी गारांचा पाऊसही झाला. याचा तडाखा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना बसला.
परंतु सर्वाधीक नुकसान नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर या बागायती तालुक्यांसह व लोहा तालुक्याला बसला. या भागातील केळी, संत्रा, मोसंबी, चिकू, गहू, हरभरा, रब्बी व उन्हाळी ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अस्मानी संकटाने चार हजार ७९४ हेक्टरचा घास घेतला. यात जिरायती ८९० हेक्टर, बागायती २४१० हेक्टर, फळपिकांचे १४९० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. वादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडली. शेतातील निवारेही उध्दस्त झाले. तर वीज पडून लहान-मोठी १४ जनावरांचा मृत्यू झाला. तर १९ नागरिक जखमीही झाले.
नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला माहिती कळविली आहे. दरम्यान शुक्रवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी धीर देवून शासनाकडून योग्य भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
संपामुळे पंचनामे थांबणार नाहीत ः जिल्हाधिकारी
जिल्ह्यात गुरुवारी निसर्गाच्या प्रकोपामुळे झालेल्या नुकसानीचे पंचमाने करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परंतु सध्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी संपावर असल्यामुळे पंचनामे होणार की नाहीत अशी भीती होती.
परंतु जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परिस्थितीचे गार्ंभीय लक्षात घेऊन संपावरील कर्मचारी पंचमाने करण्याच्या कामात आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे होतील, असे ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.