Crop Damage:राज्यात पीक नुकसान १५ लाख हेक्टरच्या पुढे

अतिवृष्टी व पुरामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात १३ लाख हेक्टरच्या आसपास खरीप पिके बाधित झाली होती. पंधरवड्यात पुन्हा दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

पुणेः राज्यात पावसामुळे खरीप पिकांच्या (Kharif Crops) नुकसानीचा आकडा आता १५ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून सूचना मिळताच पीक पाहणी करण्यासाठी ४८ तासांच्या आत सर्वेक्षक नियुक्त करा, अशा सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात १३ लाख हेक्टरच्या आसपास खरीप पिके बाधित झाली होती. पंधरवड्यात पुन्हा दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. “प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत १५.१० लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झालेली आहेत. राज्याच्या काही भागात अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

पीक हानी (Crop Damage) वाढत असल्यामुळे आता जिल्हाधिकारी अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय संयुक्त समित्यांच्या बैठका घ्याव्या लागणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे प्रमाण हे एकूण पिकाखालील क्षेत्राच्या किती टक्के आहे, हे या समित्यांकडून ठरविले जाते. त्यामुळे या बैठका वेळेत घ्याव्यात, असे आयुक्तालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

खरीप पिकांच्या नुकसानीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आता पीकविमा (Crop Insurance) योजनाचा आधार वाढला आहे. भरपाई मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने नुकसान होताच ७२ तासाच्या आत विमा कंपनीला सूचना द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याला पात्र ठरवविण्याचे निकष बदलण्यात आले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, असा प्रयत्न कृषी विभागाचा आहे.

“सध्या राज्यात विविध ठिकाणी ढगफुटी, अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे ओढ्या-नाल्यांना आलेले पूर आणि शेतात साठलेले पाणी यामुळे विमा संरक्षित पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये गावोगाव फिरावे तसेच नुकसानग्रस्त पिकांची सूचना कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करावे,” असे कृषी आयुक्तालयाने कंपन्यांना सांगितले आहे.

‘कृषी’च्या कर्मचाऱ्यांना या सूचना

- तालुका कृषी अधिकारी कार्यालयांनी नुकसानीबाबत माध्यमात आलेल्या माहितीच्या नोंदी ठेवाव्यात.

- महसूल मंडळनिहाय पडलेल्या पावसाची दैनंदिन आकडेवारी जपून ठेवावी

- आपत्तीग्रस्त क्षेत्रातील ‘महसूल मंडळनिहाय पंचनाम्यांची माहिती तालुका कार्यालयात ठेवावी. पंचनामे दहा दिवसांत पूर्ण करावेत

शेतकऱ्यांनी विमा कंपनीला कळवावे

नुकसानीबाबत शेतकरी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडेदेखील पीक नुकसानीच्या लेखी सूचना देऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशी सूचना मिळताच ४८ तासाच्या आत संबंधित विमा कंपनीला सूचना कळवावी व त्याची पोहोच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठेवावी. क्रॉप इन्शुरन्स अॅपद्वारे सूचना पाठविण्याची शेतकऱ्यांना मदत करावी, असे आयुक्तालयाने क्षेत्रिय अधिकाऱ्यांना कळविले आहे.

Crop Damage
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही समाधानकारक पाऊस

...असे असेल पंचनाम्यांचे प्रमाण

पंचनामे करताना विमा कंपनीचा सर्वेक्षक, तालुका स्तरीय कृषी अधिकारी व शेतकरी यांनी संयुक्त पंचनामा करावा. पिकाखालील क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा कमी क्षेत्रावर असल्यास सर्व प्राप्त सूचनांचे वैयक्तिक पंचनामे करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त क्षेत्र हे पिकाखालील क्षेत्राच्या २५ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असल्यास प्राप्त सूचनांच्या २६ टक्के सूचनांचे सर्वेक्षण करावे, तर पिकाखालील क्षेत्राच्या ५० टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावरील नुकसान असल्यास प्राप्त सूचनांच्या ३० टक्के सूचनांचे नमुना सर्वेक्षण करावे, अशा सूचना राज्यभर देण्यात आल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com