Asahadhi Wari :अवघी पंढरी पावसासह भक्तिरसात चिंब

आज आषाढीचा मुख्य सोहळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
Ashadhi Wari
Ashadhi WariAgrowon

पंढरपूर, जि. सोलापूर ः

विठू माऊलीये हाचि वर देई ।।

संचोरिनी राही हृदयामाजी ।।

तुका म्हणे काही न मागे आणिक ।।

तुझे पायी सुख सर्व आहे ।।, अशी आस मनात ठेवत आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. या सोहळ्यात दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने शनिवारी (ता.९) भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. त्यात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे एकीकडे टाळ-मृदंगाच्या गजरासह हरिनामाचा जयघोष आणि दुसरीकडे पावसाच्या संततधारेमुळे अवघी पंढरी भक्तिरसात चिंब झाली.

कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रा भरत असल्याने पंढरी भाविकमय झाली आहे. शनिवारी (ता. ९) दुपारपर्यंत सुमारे सात ते आठ लाख वारकरी पंढरीत दाखल झाल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरा त्यात आणखी वाढ होईल. गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारीही दिवसभर ती सुरूच होती. पण या पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.

राज्यासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधूनही वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळा आणि वारकऱ्यांच्या राहुट्यांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजनाचे सूर आळवले जात आहेत. विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, भक्तिमार्ग, कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, रेल्वे स्टेशन परिसरात वारकऱ्यांची मोठी वर्दळ आहे. शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता आदी प्रमुख मार्गावर प्रासादिक, खेळणी साहित्य, तुळशीमाळा, मृदंग, तबला, वीणा आदी भजनी साहित्याची दुकाने आदींनी व्यापारपेठाही सजल्या आहेत.

दशमीच्या स्नानासाठी झुंबड

दशमीच्या स्नानासाठी शनिवारी वारकऱ्यांची भल्या पहाटेपासूनच चंद्रभागा तीरावर एकच झुंबड उडाली. चंद्रभागेतील स्नान आणि प्रदक्षिणा मार्गावरील फेरी वारकरी आवर्जून पूर्ण करत होते. पदस्पर्श दर्शनाची रांग आजही पत्राशेडच्याही पुढे दूरपर्यंत गेली होती. एका वारकऱ्याला दर्शनाला १५ ते १८ तास लागत आहेत. तर प्रतिमिनिटाला ३५ ते ४५ वारकरी दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com