
Nashik Crop Damage News : जिल्ह्यात सटाणा व मालेगाव तालुक्यात गुरुवारी (ता.६) सायंकाळी साडेपाच वाजेनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे एप्रिलच्या सुरुवातीलाच पुन्हा शेतीपिकांना मोठा फटका (Crop Damage) बसला आहे.
उन्हाळ कांद्याला (Summer Onion) मोठा फटका बसला आहे. काही डाळिंब बागा (Pomegranate Orchard) बहरात असताना मोठी फूलगळ झाली आहे. तर काही प्रमाणात गहू काढणी (Wheat Harvesting) बाकी असताना नुकसान झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे कसमादे भागाला मोठा फटका बसला आहे. मात्र हे दुष्टचक्र शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने आर्थिक कोंडी झाली आहे.
त्यातच सटाणा तालुक्यांच्या उत्तर-पूर्व भागातील बिजोटे, आखतवाडे, गोराणे, आसखेडा, नामपूर, वागळे, उत्राणे, जायखेडा, निताने, पारनेर, भुयाणे यासह ब्राह्मणगाव परिसरात पाऊस झाला आहे. त्यामुळे काही भागात खळ्यांवर पाणी साचले होते.
सटाणा तालुक्याच्या पूर्वेला व मालेगाव तालुक्याच्या पश्चिमेला काही भागात वावटळ तयार झाली होती. त्यामुळे शेतीमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
सटाणा तालुक्यातील तळवाडे भामेर येथे माजी सरपंच श्यामराव गायकवाड यांनी कर्ज काढून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. मात्र वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या पोल्ट्री शेडचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. नामपूर परिसरासह मोसम व काटवन खोऱ्यात कांदा पाण्यात भिजला.
ताहाराबाद, फोपीर रस्त्यालगत वीटभट्टी चालकांचेही मोठे नुकसान झाले. काही घरांचे पत्रेही उडाले.
मालेगाव तालुक्यातील उत्तर भागात गाळणे, डोंगराळे, टिंगरी, भारदेनगर या परिसरातही कांदा पिकांची हानी झाली. शुक्रवारी (ता.७) पहाटे नांदगाव तालुक्यात बाणगाव परिसरात विजेच्या कडकडासह पावसाच्या रिमझिम सरी पडल्या.
पंचनामे करण्याची मागणी
महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह व पोल्ट्री व्यवसायिकांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.