
Jalgaon Crop Damage News: गेल्या पाच ते सात मार्चदरम्यान अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तडाखा दिल्याने अनेक पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले होते. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधित झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना भरपाईची (Compensation) प्रतीक्षा आहे.
पुन्हा १३ ते १७ मार्चला बेमोसमी पावसाचे संकट उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. रविवारीच (ता. १२) खानदेशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती व चिंता आहे. कारण मका, गहू, हरभरा, दादर ज्वारी, पपई, कलिंगड, खरजूब व इतर भाजीपाला पिके काढणीवर आहेत. पाऊस आल्यास मोठी हानी होईल.
मजूरटंचाई वाढली
पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामुळे पिकांची काढणी रखडत सुरू आहे. फळ पिकांचे दरही कमी अधिक होत आहेत. कलिंगडाचे दर नऊ रुपये प्रतिकिलोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत होते.
परंतु दर साडेआठ रुपये प्रतिकिलो असे झाले आहेत. खरबुजाचे दरही कमाल ११ रुपये प्रतिकिलो, असेच आहेत. तसेच पपई दरही कमी झाले असून, कमाल १३ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर शेतकऱ्यांना मिळत आहे.
गहू, मका, दादर ज्वारी व इतर पिकांची कापणी, काढणी एकाचवेळी अनेक भागांत सुरू झाली आहे. कारण शेतकऱ्यांना पुन्हा बेमोसमी पावसाची भीती आहे. परिणामी मजूरटंचाई तयार झाली असून, मजुरीचे दरही वधारले आहेत.
दादर ज्वारीची कापणी त्रासदायक...
रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी, दादर पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकतेच अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यात झाले आहे.
जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधित झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहू, मका, ज्वारी, सूर्यफूल, कांदासह केळी, पपई, मोसंबी लिंबूचा सामावेश होता.
सर्वाधिक नुकसान मका, दादर ज्वारी या पिकांचे झाले आहे. दादर ज्वारी आडवी झाली असून, तिची कापणी करणे त्रासदायक ठरत आहे. धुळे व नंदुरबारातही पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात एकूण सुमारे १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
नंदुरबारात शहादा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. धुळ्यात साक्री, धुळे व शिंदखेडा तालुक्यांत अधिकचे नुकसान झाले आहे. अहवाल तयार झाले असून, ते शासनाला सादर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना आता तातडीने नुकसान भरपाई मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.