Rain : संततधार पावसामुळे खरिपाचे नुकसान

अतिपावसामुळे राज्याच्या अनेक भागांतील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे ः अतिपावसामुळे (Heavy Rain) राज्याच्या अनेक भागांतील खरीप पिकांचे (Damage To Kharif Crop) नुकसान झाले आहे. विदर्भात ६० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. राज्यातील खरिपाचा पेरा आता १०४ लाख हेक्टरच्या पुढे गेला असून अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली असल्यामुळे शेतकरी मशागतीच्या (Agriculture Work) कामाकरिता पावसाने तूर्त उघडीप देण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

आठवडाभरापासून अखंडित पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरुन वाहत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उद्‍भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नदीकाठची पिके वाहून गेली आहेत. धरणांमधून सोडले जाणारे विसर्ग व त्यात पुन्हा लाभक्षेत्रात होणारा पाऊस यामुळे नद्यांच्या काठची शेती जलमय झालेली आहे. नागपूरच्या सावनेर भागातील ५७ हेक्टर शेतजमीन अतिपावसामुळे खरडून गेली आहे.

Rain Update
राज्यातील खरीप Soybean, Cotton, Tur पेरणीला वेग | ॲग्रोवन| Agrowon

नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आता पीकपंचनामा करण्याची मागणी करीत आहेत. ‘‘आतापर्यंत सात जिल्ह्यांमध्ये अतिपावसाने नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र कोणत्या भागात किती नुकसान झाले आहे याची निश्‍चित माहिती हाती आलेली नाही. आम्ही पीक स्थितीवर लक्ष ठेवून आहोत,’’ असे कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. संततधार पावसामुळे राज्यातील १५ लाख हेक्टरवरील भातशेतीला मात्र दिलासा मिळाला आहे. ‘‘राज्यात सर्वत्र धानाच्या रोपवाटिका तयार होत्या. मात्र पुनर्लागणीकरिता आवश्यक पाऊस नव्हता. आता लावण्यांच्या कामाला वेग येईल.’’

दरम्यान, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी भरपावसात पुणे जिल्ह्यातील काही गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या खरीप नियोजनाची माहिती घेतली. मावळ तालुक्यातील तिकोना गड पायथा भागाला आयुक्तांनी भेट दिली. तेथील भात उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या आयुक्तांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे खरीप नियोजन बघण्यासाठी आयुक्तांनी रोपवाटिका, यांत्रिकीकरणावर आधारित कामे तसेच भातशेतीची माहिती घेतली. पुणे जिल्ह्यात पावसाअभावी भाताची पुनर्लागण रखडली होती. सततधार पावसामुळे आता भातशेतीमधील समस्या दूर होतील, असे पुण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी सांगितले.

सोमवारी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात देखील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, भारतीय हवामान शास्त्र विभागाने १५ जुलैपर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उगवून आलेल्या खरीप पिकांसाठी चालू आठवडा काळजीचा ठरण्याची शक्यता आहे. संततधार पाऊस असलेल्या भागांमध्ये पुढील दोन दिवसांत उघडीप न मिळाल्यास केलेला पेरा वाया जाणाऱ्या गावांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

Rain Update
Grape : पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

राज्यात आतापर्यंत १४१ लाख हेक्टरपैकी १०४ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पावसाची उघडीप होताच उर्वरित भागातील पेरण्या पूर्ण होतील. १५ जुलैपर्यंत खरिपाच्या सर्व पेरण्या आटोपतील. सोयाबीन व कपाशीचा पेरा बहुतेक भागांत आटोपला आहे. मात्र संततधार पावसामुळे एक दिवसापेक्षा जास्त वेळ पाणी साचून राहिलेल्या शेतांमध्ये कुज आणि मर याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

विमा योजनेत तत्काळ सहभागी व्हावे

राज्यात कधी पावसाचा खंड तर कधी अतिपाऊस अशी दोन्ही टोकाची स्थिती बघता शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत लवकरात लवकर सहभागी व्हावे. त्यामुळे संकटकाळात या योजनेतील मदतीचा लाभ मिळू शकते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गेल्या हंगामात आतापर्यंत ८४ लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला होता. चालू हंगामात आतापर्यंत पाच लाख शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला आहे. ३१ जुलैपर्यंत मुदत असली तरी शेवटच्या कालावधीत एकदम गर्दी होऊन संकेतस्थळाला अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पावसामुळे कोणत्या जिल्ह्यांत काय हानी झाली...

जिल्हा---बाधित तालुके---नुकसानीचे अंदाजे क्षेत्र---बाधित पिके

हिंगोली---वसमत, कळमनुरी---१५९४४---हळद, सोयाबीन, कापूस, फळपिके

अकोला---बाळापूर, अकोला---८६४–सोयाबीन, कापूस, तूर

वर्धा---देवळी, वर्धा, आर्वी, सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट---१६१८७–सोयाबीन, कापूस, तूर

गोंदिया---सडकड अर्जुनी, ---१---भात, भाजीपाला,

नागपूर---सावनेर---९९९----तूर, कापूस

भंडारा---तुमसर---३०----भात, तूर

गडचिरोली---अहेरी, सिरोंचा-----७४०----कापूस, भात

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com