
प्रकाश परांजपे
शहापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी (Education) खडतर प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शहापूर तालुक्यातील (Shahpur Taluka) जिल्हा परिषदेच्या सावरदेव शाळेत जाणाऱ्या एकाच घरातील तीन विद्यार्थ्यांना पालकांसोबत तानसा तलावातून (Tansa Lake) तराफ्यावर बसून हेलकावे खात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. (Rural Education System)
विशेष म्हणजे कोणतीही तक्रार न करता हे विद्यार्थी शाळेत नियमित जात असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
मुंबई शहरापासून शहापूर तालुका हाकेच्या अंतरावर असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही येथून केला जातो. मात्र शहापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागात अजूनही मूलभूत सुविधांची वानवा आहे.
तालुक्यातील अनेक गाव खेड्यांत रस्ता, पाणीपुरवठा, वीज अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या गंभीर समस्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही त्याकडे राज्य सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे.
मात्र त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. शहापूर शहरापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर सावरदेव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे.
पाचवीपर्यंत असलेल्या या शाळेत बोराळेपाडा येथील चौथी व पाचवीत शिकणारे तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
तानसा अभयारण्यात वसलेल्या या पाड्यातील कैलास चिमडा, ऋतिका चिमडा या दोघी बहिणी चौथीमध्ये; तर पाचवीमध्ये सोनाली दुमाडा ही शिकत आहे.
हे तीन विद्यार्थी पालकांसमवेत शाळेत जाण्यासाठी जंगली श्वापदांचा मुक्त वावर असलेल्या तानसा अभयारण्यातून जीव मुठीत धरून पायवाट व त्यानंतर तानसा धरणाच्या बॅकवॉटरमधून तराफ्यावर बसून हेलकावे खात जीवघेणा प्रवास करत आहेत.
तानसा अभयारण्यातील तलावाजवळ वसलेल्या बोराळे व बोराळेपाडा येथील शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ महिलांना बाजारहाट, तसेच रुग्णांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
या गंभीर समस्यांना रोज तोंड द्यावे लागत असल्याने जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुलांसाठी पालकांनी काढला मार्ग
शाळेत जाण्यासाठी प्लॅस्टिक पाईपांचा तराफा पालकांनी स्वतःच बनवला आहे. तब्बल तासभर सुरू असणारा हा खडतर प्रवास सुरू असतो. मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकही व्यग्र असल्याने त्यांच्या रोजंदारीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.