
औरंगाबाद : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ‘एनडीआरएफ’च्या निकषांप्रमाणे मदत मिळेलच. परंतु राज्यातील नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर मदतीच्या संदर्भात लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयात रविवारी (ता. ३१) मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे पत्रकारांशी संवाद साधत होते. शिंदे म्हणाले, की राज्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या (Farmers Suicides) कमी व्हाव्यात यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विशेष योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांचे कर्ज (Agriculture Credit) वेळेवर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी त्यासाठी लवकरच बैठक घेणार आहेत.
प्रत्येक शेतकऱ्याचा जीव सरकारसाठी मोलाचा आहे. आत्महत्या होऊच नये यासाठी करावयाच्या तत्काळ, अल्पमुदतीत व दीर्घमुदतीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कटिबद्ध आहे. कुरुंदा गावाच्या पुनर्वसनाचा विषय लवकरच मार्गी लावला जाईल.
औरंगाबादेत सात दिवसाला पाणी मिळत आहे. ते एक दिवसाआड मिळावे म्हणून त्यासाठीच्या उपाययोजनेसाठी दोनशे कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेरूळ घृष्णेश्वरबाबत मागण्यांचाही आढावा घेण्यात आला. ज्या योजना पूर्ण करणे शक्य आहे त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे यंत्रणेला सूचित केले आहे.
नांदेड- जालना समृद्धी मार्ग, औंढा नागनाथ विकासाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. घाटी रुग्णालय खासगीकरणाला (Privatization) विरोध होता, त्यावर सूचना देण्यात आल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक प्रस्ताव आहेत, ते तत्काळ शासन स्तरावर पाठविण्याच्या सूचना दिली आहे.
गोपीनाथ मुंडे स्मारकालाही चालना दिली जाईल. सांगली येथील खेळाडू संकेत सरगरने रौप्य पदक मिळवलं. त्याला ३० लाखांचे बक्षीस तर प्रशिक्षकला साडेसात लाखांचे बक्षीसही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तर नद्यांमधून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्याचा निर्णय झाला त्यावर कामही सुरू झाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. आपण आणि उपमुख्यमंत्री काम करतोय. शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय, पेट्रोलचे दर कमी करण्याचा निर्णय, इतर निर्णय घेतले आहेत. बाळासाहेबांच्या भूमिकेचे सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चिंता करू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पत्रकार परिषदेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagavat Karad) , औरंगाबादचे माजी पालकमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) , विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.
सरकार कालावधी पूर्ण करणार
‘ईडी’ कारवाई होती म्हणून आमच्याकडे येऊ नका, सेनेत येऊ नका आणि भाजपमध्येही जाऊ नका, केंद्रीय यंत्रणांनी सुडाने कारवाई केली असती तर न्यायालयाने दिलासा दिला असता. तसेच सरकार कालावधी पूर्ण करून पुढची निवडणूक जिंकेल, असा विश्वासही शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील ईडी कारवाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.