सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या टरबुजाला शहरात मागणी

कामठ्याच्या अल्पभूधारक शेतकऱ्याची घरपोच सेवा
सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या टरबुजाला शहरात मागणी
WatermelonAgrowon

नांदेड : उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतलेले टरबूज बाजारात आले आहे. या टरबुजाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामठा (ता. अर्धापूर) येथील अल्पभूधारक शेतकरी केशव व महानंदा कल्याणकर हे दांपत्य घरपोच टरबूज विक्री करत आहे. त्यांचे टरबूज हातोहात विक्री होत आहेत.

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतीमालास शहरातील ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. विविध प्रकारच्या डाळी, धान्य, लाल मिरची, हळद आदी शेतीमाल रसायनमुक्त पिकविण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत. या सोबतच फळे, भाजीपालाही सेंद्रिय पद्धतीने अवलंब करून पिकविण्यात येत आहे. अशा शेतीमालाला बाजारात मोठी मागणी असल्याने अनेक शेतकरी याकडे वळले आहेत. कृषी विभागही विषमुक्त शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती अशा प्रयत्नांना पाठबळ देत आहे.

कामठा (ता. अर्धापूर) येथील अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्य केशव व महानंदा कल्याणकर यांनी त्यांच्या एक एकर शेतात यंदा टरबुजाची लागवड केली. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक निविष्ठा न वापरता त्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. या टरबुजाला व्यापाऱ्याकडून किंमत होत नसल्याने त्यांनी घरी असलेल्या अटोचा यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला.

नांदेड शहरातील सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत ते पाच क्विंटल टरबूज विक्रीसाठी आणतात. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले टरबूज असल्याने फळात गोडी अधिक आहे. यामुळे त्यांचे टरबूज दहा रुपये प्रतिकिलो प्रमाणे हातोहात विक्री होतात, असे केशव कल्याणकर यांनी सांगितले.

दरम्यान, शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले टरबूज थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे या शेतकरी दांपत्याचा कृषी विभागाकडून नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक श्री. बिरादार, सहायक प्रशासन अधिकारी श्री. बोरा आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.