Abdul Sattar : ‘सिल्लोड महोत्सव’ वसुली प्रकरण दणाणले

‘सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी वसुलीचे टार्गेट’ या शीर्षकाचे वृत्त दै.ॲग्रोवनमध्ये रविवारी प्रसिद्ध झाले होते. याची दखल सभागृहात घेण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या वृत्ताचा दाखला देत प्रवेशिका खपविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट दिल्याचे सांगितले.
Abdul Sattar | Sillod Festival
Abdul Sattar | Sillod FestivalAgrowon

बाळासाहेब पाटील/ ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर : घोडबाभूळ (जि. वाशीम) येथील ३७ एकर सरकारी गायरान जमीन (Grazing Land) बेकायदेशीरपणे विक्री आणि सिल्लोड महोत्सवात (Sillod Festival) कृषी विभागाच्या (Agriculture Department) अधिकाऱ्यांकरवी १५ कोटींची वसुली सुरू असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांकडून जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत जोरदार गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज आधी एक तासांसाठी आणि नंतर पूर्ण दिवसासाठी तहकूब केले.

‘सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी वसुलीचे टार्गेट’ या शीर्षकाचे वृत्त दै.ॲग्रोवनमध्ये रविवारी प्रसिद्ध झाले होते. याची दखल सभागृहात घेण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या वृत्ताचा दाखला देत प्रवेशिका खपविण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट दिल्याचे सांगितले. काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ॲग्रोवनचा अंक दाखवत सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

या मुद्द्यावर गोंधळ सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज पुकारल्याने आमदार आक्रमक झाले. विरोधी आमदारांनी वेलमध्ये धाव घेत, ‘राजीनामा द्या राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या’, ‘सत्तारांनी घेतलेत खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके’, ‘श्रीखंड घ्या, कुणी भूखंड घ्या’ अशा घोषणा दिल्या. विधानभवनाच्या पायऱ्यांवरही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत वातावरण तापवले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अजित पवार यांनी सत्तार यांच्याबाबत स्थगन प्रस्ताव दाखल केला होता.

Abdul Sattar | Sillod Festival
Abdul Sattar : सिल्लोड महोत्सव सत्तारांच्या अंगाशी ?

मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दालनात फेटाळला. मात्र, नियम ३५ अन्वये अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना गायरान जमीन परस्पर विक्रीप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सिल्लोड महोत्सवासाठी सुरू असलेल्या वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही प्रकरणावर सत्तार यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.

Abdul Sattar | Sillod Festival
Abdul Sattar : वाद, घोटाळे आणि शिवराळ भाषा; कृषिमंत्री सत्तारांची कारकीर्द वादग्रस्त का ठरली ?

दरम्यान, सिल्लोड महोत्सवावर विरोधी पक्षनेते बोलत असताना अध्यक्षांनी रोखल्याने विरोधी आमदार आक्रमक झाले. यावेळी अजित पवार यांनी ‘मी तुमच्या आधीपासून सभागृहात आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे. त्यामुळे बोलू देणार नाही, असे चालणार नाही’ असे सांगत सिल्लोड महोत्सवासाठी २५ ते ३० कोटी रुपयांची वसुली सुरू आहे. कृषी संचालक पैसे गोळा करण्याचा कामाला लागले आहेत.

Abdul Sattar | Sillod Festival
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांनी कृषी खात्याची प्रतिमा धुळीस मिळवली...

कृषी उद्योग कंपन्या, खते, कीटकनाशके, बियाणे विक्रेते, संघटना, कृषी यंत्रे पुरवठादार अशा सर्वांकडून वसुली सुरू आहे. दहापेक्षा जास्त तालुके असलेल्या जिल्ह्यांतून २५ हजार रुपयेचे ३० प्लॅटिनम प्रवेशिका, १५ हजार रुपयांच्या ५० डायमंड, १० हजार रुपयांच्या ७५ गोल्ड आणि साडेसात हजार रुपयांच्या १५० सिल्व्हर प्रवेशिका अधिकाऱ्यांना खबविणे बंधनकारक केले आहे. दहापेक्षा कमी तालुके असलेल्या जिल्ह्यात १५ हजारांच्या १५ प्लॅटिनम, १५ हजार रुपयांच्या २५ डायमंड, १० हजार रुपयांच्या ४० गोल्ड आणि ७५ हजार रुपयांच्या ७५ सिल्व्हर प्रवेशिका जिल्हा

गुणवत्ता निरिक्षकांनी खपवाव्यात असा फतवा काढला आहे. राज्यातील निविष्ठा उद्योगांचे परवाने दिलेल्या कंपन्यांनाही प्रवेशिका खपविण्याचे टार्गेट दिले आहे. सिल्लोड येथे घेण्यात येणाऱ्या कृषी महोत्सवातील बैलगाडी शर्यतीसाठी सांस्कृतिक विभागाने निधी दिला आहे. तर कृषी विभागानेही काही निधी दिला आहे. बाकी पैसे वसुली करून मिळविले जात आहे. हा मोठा भ्रष्टाचार आहे. या प्रकरणी कृषिमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सहा महिन्यांपासून वादग्रस्त

गेल्या सहा महिन्यांपासून कृषिमंत्री वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत, भ्रष्ट कामे करत आहेत. तरीही तुम्ही पाठीशी घालता आहात, असा सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला. कधी महिला खासदारांना अर्वाच्च्य शिवीगाळ केली जाते. कधी जिल्हाधिकाऱ्यांना चहा घेत नाही मग दारू पिता का? असे विचारतात हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

कृषीमंत्री सत्तार अनुपस्थित

सिल्लोड महोत्सव आणि गायरान जमीन प्रकरणावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू असताना कृषिमंत्री सत्तार हे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांचे स्वीय सहायक आणि विशेष कार्यकारी अधिकारी मात्र विधानसभेत अधिकारी कक्षात उपस्थित होते. महोत्सवाच्या वसुलीमुळे पिचलेल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना फोन करत सुटकेचा निःश्वास सोडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com