
पुणे ः पदोन्नती (Promotion) रखडल्यामुळे राज्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी (Agri Officer) नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रतिनियुक्तीची पदे सरळ सेवेतून भरण्यास विरोध दर्शविला आहे. रिक्तपदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (Maharashtra Public Service Commission) पाठविताना प्रतिनियुक्तीची पदे विचारात घेऊ नयेत, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र कृषिसेवा वर्ग दोन राजपत्रित कल्याणकारी संघटनेने कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडे कैफियत मांडली आहे. कृषी विभागात वर्ग एकची पदे कमी आहेत. त्यामुळे वर्ग दोनमधील अधिकाऱ्यांना २५-३० वर्षे पदोन्नत्या मिळत नाहीत. काही अधिकारी पदोन्नतीविना निवृत्त होत आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. या बाबत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यामुळे उपविभागीय कृषी अधिकारी व उपसंचालकांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पदोन्नती ७५ टक्के, तर सरळसेवा भरती २५ टक्के असे प्रमाण राखण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले होते. परंतु, दोन वर्षात त्याबाबत काहीही निर्णय घेतला गेला नाही.
राज्यातील विविध सरकारी कार्यालये व महामंडळांमध्ये कृषी खात्याचे अधिकारी घेतले जातात. ती पदे गृहीत धरून कृषी विभागाचे संख्याबळ निश्चित करण्यात आले आहे. मात्र, प्रतिनियुक्तीवरील संख्याबळ संबंधित सरकारी प्रकल्प किंवा योजनेनुसार बदलत असते. ही पदे कृषी विभागाच्या मंजूर आकृतिबंधाच्या व्यतिरिक्त आहेत. त्यामुळे सरळ सेवा भरतीला मान्यता घेताना प्रतिनियुक्तीची पदे वगळून भरती करू देण्याची मागणी कृषी विभागाने राज्य शासनाकडे करायला हवी, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांमध्ये असंतोष
“तालुका कृषी अधिकारी हा कृषी विभागाच्या मनुष्यबळातील महत्त्वाचा घटक आहे. तोच सर्व योजना क्षेत्रीय पातळीवर चालवतो. मात्र, त्याच्या समस्यांबाबत नकारात्मक भूमिका घेतली जात असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे कृषी सचिवांना कळविले आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.
१३५ अधिकाऱ्यांना नाही पदोन्नती
राज्यातील ८०० पैकी किमान १३५ तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. या अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीच तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे १९९१ मध्ये तालुका कृषी अधिकारी पदावर रुजू झालेला अधिकारी अद्यापही त्याच पदावर कार्यरत आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.