डोंगरी भागातील नागरिकांना जुलै-ऑगस्टचे आगाऊ धान्य

दरड कोसळल्यामुळे किंवा पूर आल्यामुळे रस्ते बंद होऊन दळणवळणाची साधने बंद पडतात, अशा परिस्थितीत गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आणि नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्यास अडचण निर्माण होते.
Food Security
Food SecurityAgrowon

पुणे : भोर तालुक्यातील पश्‍चिम भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते बंद होणे, दरड कोसळणे असे प्रकार होतात. दरड कोसळल्यामुळे (Land Sliding) किंवा पूर आल्यामुळे रस्ते बंद होऊन दळणवळणाची साधने बंद पडतात, अशा परिस्थितीत गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आणि नागरिकांना अन्न सुरक्षा (Food Security) योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे तालुक्यातील १३ गावांतील लाभार्थ्यांना जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांचा आगाऊ धान्यकोटा देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

भोर तालुक्यातील हिडोशी खोऱ्यातील शिळिंब, शिरवली, हिमा, दापकेघर, गुढे, हिडोशी, दुर्गाडी, निवगण, माझेरी, शिरगाव, शिरोली, वारखंड, कुडली, कुंबळे आणि वेल्हे तालुक्यांतील कर्णवडी अशा १३ गावांतील लाभार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्याचा धान्यकोटा आगाऊ देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत दरमहा नियमित वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिमाणसी २ किलो गहू २ रुपये किलो दराने आणि ३ किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने जुलै-ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे देण्यात येणार आहे. याबरोबरच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिमाणसी १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ जुलै-ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे मोफत देण्यात येणार आहे. अंत्योदय लाभाकरिता दरमहा नियमित वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये किलो दराने आणि २० किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी देण्यात येणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिमाणसी २ किलो गहू आणि प्रती महिना प्रति माणशी ३ किलोही याचवेळी तांदूळ देण्यात येणार आहे.

‘स्वस्त धान्य दुकानातून सर्व धान्यांचा लाभ घ्यावा’

१३ गावांना जुलै-ऑगस्टचे एकत्रित धान्यवाटप करण्यासाठी गहू ३८०.७४ क्विंटल आणि तांदूळ ८१७.०४ क्विंटल लागणार आहे. वरील १३ गावांतील लाभार्थींनी संबंधित स्वस्त धान्य दुकानातून हे सर्व धान्य लवकर प्राप्त करून घ्यावे. म्हणजे अतिवृष्टीच्या काळात अन्नसुरक्षा योजनेतील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, असे आवाहन भोर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com