‘आयसीएआर’च्या पुरस्कारांचे दिल्लीत वितरण

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) स्थापनादिवसाचे औचित्य साधत दरवर्षी १६ जुलैला देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्काराने गौरविण्यात येते.
Ravindra Metkar
Ravindra MetkarAgrowon

नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) स्थापना दिवसाच्या निमित्ताने देशभरातील दहा शेतकऱ्यांचा विविध कृषी पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील अमरावती येथील पोल्ट्री व्यावसायिक तसेच प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर (Ravindra Metkar) यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश होता. पुसा दिल्ली येथे शनिवारी (ता. १६) झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची उपस्थिती होती.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) स्थापनादिवसाचे औचित्य साधत दरवर्षी १६ जुलैला देशभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा देशभरातील दहा शेतकऱ्यांना विविध श्रेणीतील पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून अमरावती येथील पोल्ट्री व्यावसायिक तसेच प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश होता. त्यांना जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एक लाख रुपये रोख तसेच सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापक त्रिलोचन मोहपात्रा, कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, आयसीएआरचे उपमहाव्यवस्थापक ए. के. सिंग, पवन कुमार अग्रवाल, निती आयोगाचे (Niti Aayog) सदस्य प्रा. रमेशचंद्र, राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे या वेळी उपस्थित होते.

२००४ सगुना राईस तंत्रज्ञान देणारे चंद्रशेखर भडसावळे यांना हा सन्मान मिळाला होता. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर महाराष्ट्राने पुन्हा या पुरस्कारावर नाव कोरल्याने रवींद्र मेटकर यांचे कौतुक होत आहे.

रोज एक लाख अंड्यांचे उत्पादन

घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी रवींद्र मेटकर हे मातोश्री पोल्ट्रीचे संचालक आहेत. रोज सुमारे एक लाख अंड्याचे उत्पादन त्यांच्या या व्यवसायात होते. सोबतच देशभरातील विविध फळ तसेच पीक वाणांची लागवड त्यांनी आपल्या शेतावर केली आहे. घातखेड कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक अतुल कळस्कर यांचे सातत्याने मार्गदर्शन त्यांना मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com