
Ratanagiri Agriculture News ः ‘‘काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी रत्नागिरी जिल्हा काजू प्रक्रियाधारक संघातर्फे शनिवारी (ता. ११) आणि रविवारी (ता.१२) राज्यस्तरीय काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी लागवडीसह मार्केटिंगवर मार्गदर्शनासह अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन भरवण्यात येईल,’’ असे संघाचे जिल्हाध्यक्ष विवेक बारगीर यांनी सांगितले.
बारगीर म्हणाले, ‘‘काजू क्षेत्रातील समस्या विचारात घेऊन डिसेंबर २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेत महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया धारकांचा विचार करून सरकारने स्वतंत्र मदतीचा १ हजार १७५ कोटींचा निधी दिला गेला आहे.
काजू उत्पादकांसाठी लागवड, नियोजन, अर्थकारण, बाजारभाव, काजू उद्योजकांसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन, व्यवस्थापन, अर्थकारण, काजू बी संकलन, बाजारभाव, समस्या यावर मार्गदर्शन आणि चर्चा होतील."
"काजू क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान होईल. एमआयडीसीतील दळवी काजू प्रक्रिया प्रकल्प येथे होणाऱ्या काजू महोत्सवाला पालकमंत्री उदय सामंत, खासदार नीलेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आदी उपस्थित राहतील.’’
‘‘गेली पाच वर्षे, काजू प्रक्रिया धारक संघ, रत्नागिरी जिल्हा आणि महाराष्ट्र काजू संघाच्या माध्यमातून आजारी काजू उद्योगाला उभारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. २०१७ मध्ये दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली केसरकर समितीने अनेक योजना तयार करून अहवाल तयार केला.
काजू कारखानदारांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन व्हावे, केसरकर समिती अहवालाची अंमलबजावणी व्हावी, नियमित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ व्हावे, नवीन उद्योजकांना बँकेच्या जाचक अटींमधून मुक्तता मिळावी, पणन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून काजू बी चे संकलन व्हावे आदी मागण्या वेळोवेळी सरकारकडे केल्या. त्यास यश आले आहे,’’ असे बारगीर म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.