
Sangli News : टेंभू योजनेचे (Tembhu Irrigation Scheme) उन्हाळी आवर्तन दीड महिन्यापासून सुरू आहे, मात्र बंदिस्त पाईपलाईनवर देखरेख आणि देखभाल करणारे ठेकेदार आणि उपविभागीय टेंभू सिंचन विभागातील (Tembhu Irrigation Department) अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयाअभावी पाण्याच्या नियोजनाचा आटपाडी तालुक्यात पुरता फज्जा उडाला आहे. पाण्याच्या नियोजनाची अत्यंत आवश्यकता आहे.
टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात आले आहे. योजनेवरील मुख्य आणि उपवाहिकेची कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे तालुक्याच्या बहुतांश भागातील ओढे, नाले, तलाव, बंधाऱ्यांपर्यंत जाऊ शकते.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून अनेक गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे १६ मार्चपासून टेंभूचे उन्हाळी आवर्तन सुरू केले आहे. अनेक भागांत मागणीप्रमाणे पाणी सोडले जाते तर अनेकांना अद्याप पिण्यासाठीही पाणी मिळालेले नाही.
टेंभूचे पाणी सोडण्याचे नियोजन टेंभू उपविभागीय विभागातील अधिकारी मागणीप्रमाणे करतात. त्याप्रमाणे पाईपलाईनचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना मागणी असलेल्या त्या त्या भागात पाणी सोडण्याच्या सूचना केल्या जातात.
संबंधित ठेकेदाराने प्रत्येक पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यासाठी आणि देखभालीसाठी माणसे नेमली आहेत.
सध्या टेंभू उपविभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या यंत्रणेत कसलाही समन्वय नाही. एवढेच नव्हे तर टेंभूचे अधिकारी आणि फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यातही ताळमेळ नाही. अधिकारी कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवतात.
कर्मचाऱ्यांनी नियोजन केले तर त्यांच्या परस्पर ठेकेदारांना पाणी सोडण्याच्या वेगळ्याच सूचना केल्या जातात. तसेच पाईपलाईनचेवर देखरेख ठेवणारी यंत्रणा यांचे वेगळेच नियोजन असते. या सगळ्यांचा समन्वय आणि सुसंवाद होत नसल्यामुळे गेले दीड महिन्यापासून टेंभूच्या पाण्याचा पुरता फज्जा उडाला आहे. यंत्रणेला हाताशी धरून अनेक ठिकाणी लेखी मागणी नसलेल्या भागातच पाणी सोडले जाते. त्यामुळे नियोजन कोलमडले आहे.
खरसुंडी कालव्यावर जोडलेल्या मुख्य पाईप आणि त्याला जोडलेल्या सर्व उपवाहिकांना एकावेळी पाणी सोडण्याची क्षमता आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामे निकृष्ट केल्याने वाहिन्यांना जागोजागी गळती वाढत चालली आहे. गळती काढण्याची कामे वाढत चालल्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पाईपलाईनने कमी वेगाने आणि क्षमतेने पाणी सोडले जात आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नियोजन करून पाईपलाईन केलेल्या ठेकेदारांना कळवले जाते. संबंधित ठेकेदाराने दिलेल्या नियोजनाप्रमाणे व तेवढ्या क्षमतेने शेतकऱ्यांना पाणी देण्याची जबाबदारी आहे. कालव्यावरून आलेल्या मुख्य खरसुंडी आणि डावा कालव्यावरील वाहिकेची एकावेळी १३५ क्युसेकने पाणी सोडण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र ३० ते ३५ क्युसेकने पाणी सोडले जाते. मागणी जास्त आणि ठेकेदार पाईपलाईन लिकेजच्या भीतीमुळे कमी पाणी सोडतात. पाईपलाईनवर देखरेखीसाठी आणि पाणी सोडण्यासाठीही अत्यंत कमी माणसे नेमली आहेत. या साऱ्याची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली आहे.
- महेश पाटील, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग, आटपाडी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.