कृषी खात्यात जातीच्या प्रमाणपत्रांचा संशयकल्लोळ

पंधरा अधिकाऱ्यांकडे बोगस प्रमाणपत्रे; कर्मचाऱ्यांचा दावा
कृषी खात्यात जातीच्या प्रमाणपत्रांचा संशयकल्लोळ
Agriculture DepartmentAgrowon

पुणे ः कृषी खात्यातील (Department Of Agriculture) १५ अधिकाऱ्यांकडे जातीची बोगस प्रमाणपत्रे (Bogus Cast Certificate) असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडूनच केला जात आहे. यातील १३ अधिकाऱ्यांना तूर्त कोणत्याही नव्या पदांवर नियुक्त न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांकडून प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक पाहून त्यानंतर सवलती देणारे आणि एखादा कागद कमी असल्यास अनुदान नाकारणारे कृषी खाते स्वतः मात्र बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सवलती देते आहे. “कृषी खात्यात सहसंचालक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत संशय आहे. मात्र या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली नाही. तसेच कारवाई टाळण्यातदेखील यश मिळवले आहे,” अशी माहिती आस्थापना विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

जात प्रमाणपत्राबाबत वाद असलेल्या काही विशिष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना आस्थापना विभाग हेतुतः कारवाईच्या जाळ्यात सापडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा देखील आरोप काही कर्मचारी करीत आहेत. “जात प्रमाणपत्राबाबत असलेला संशय दूर करू न शकलेले १३ अधिकारी कृषी खात्यात होते. त्यापैकी चार अधिकारी निवृत्तदेखील झाले आहेत. तसेच, उर्वरित अधिकाऱ्यांपैकी काही जणांना अडगळीत बसवण्यात आले आहे. मात्र काहींना थेट कार्यकारी पदे दिली जात आहेत,” असा आरोप एका अधिकाऱ्याने केला.

विशेषतः अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील जात प्रमाणपत्रांबाबत मोठ्या प्रमाणात संशयास्पद प्रकरणे आहेत. २०१७ मध्ये भारतीय अन्न महामंडळ विरुद्ध जगदीश बहिरा दाव्यात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. ‘मागास जातींसाठी असलेल्या आरक्षणाच्या आधारे सरकारी सेवा मिळवलेल्या व त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवलेल्या व्यक्तींना सरकारी सेवेत संरक्षण देता येत नाही, असा हा निकाल होता. त्यानंतर राज्य शासनाने अशा कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय संख्या निश्‍चित केली होती. त्यात कृषी खात्याचाही समावेश आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

ते अधिकारी कोण?

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या नावाखाली कृषी खात्याचा आस्थापना विभाग आमचा छळ करतो आहे. मात्र, या विभागाचे सर्व अधिकारी असे प्रमाणपत्र सादर करू शकले आहेत का, असा सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहेत. कृषी खात्यात कर्मचारी किती, किती जणांची जात पडताळणी झाली, पडताळणी न करणारे अधिकारी किती, बोगस जात प्रमाणपत्र आढळले असल्यास काय कारवाई केली, अशी सर्व माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध का केली जात नाही, असे सवाल आता कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com