द्रौपदी मुर्मू ऐतिहासिक विजयाकडे‘

विधानसभा, लोकसभेसाठीही समीकरणे जुळणार
द्रौपदी मुर्मू ऐतिहासिक विजयाकडे‘
President ElectionAgrowon

नवी दिल्ली ः येत्या २१ जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरण्याची सुचिन्हे आहेत. देशाच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातून आलेल्या व त्याही महिला नेत्या विराजमान होण्याची पहिलीच वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने झारखंडच्या माजी राज्यपाल व ओडिशातील ज्येष्ठ पक्षनेत्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे नाव जाहीर केले आहे. सध्याचे बलाबल पाहता मुर्मू निवडून आल्या तर स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती (President Of India) ठरतील.

भाजपकडे आताच जवळपास साडेसहा ते सात लाख इतकी मते पक्की मानली जात आहेत व निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त पाच लाख ४० हजार मते आवश्यक असतात. मुर्मू रायरंगजंगच्या रहिवासी आहेत, तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा हजारीबागचे माजी खासदार आहेत. या दोघांचेही झारखंड बरोबर घट्ट नाते असल्याने अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात निर्माण झालेले हे छोटे आदिवासी बहुल राज्य अचानक चर्चेत आले आहे. राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेल्या मुर्मू यांच्या नावाची घोषणा करून भाजप नेतृत्वाने एनडीएला राज्यसभेत साथ देणारे बिजू जनता दलासारखे पक्ष पहिल्या झटक्यात आपल्या बाजूला वळवून घेतले. दुसरीकडे आम आदमी पक्षासारख्या अनेक पक्षांसमोर मोठे प्रश्नचिन्हही उभे केले आहे.

अग्निपथ सारख्या योजनेला विरोधाची भूमिका घेणारे नितीशकुमार यांच्यासारखे नेते पहिल्या फटक्यात मुर्मू यांना पाठिंबा देतात ही सूचक घडामोड मानली जाते. या मागील भाजपची राजकीय गणितेही स्पष्ट आहेत. पुढील दोन वर्षांत १८ राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. यातील गुजरातसह किमान पाच राज्यांत अनुसूचित जमाती व आदिवासी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र व झारखंड या राज्यांतील विधानसभांच्या ३५० हून जास्त जागांवर आदिवासी समाजाचा वरचष्मा मानला जातो. गुजरातमध्ये तर राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी आदिवासी समाज मोठी भूमिका बजावतो.

मूर्मू यांची राष्ट्रपतिपदी निवड होणे हा या समाजाला फार मोठा संदेश ठरेल असे मानले जात आहे. देशभरात अनुसूचित जमातीचे ८.९ टक्के मतदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची गणितेही यामागे आहेत. उज्ज्वला सारख्या योजनांमुळे ग्रामीण व गरीब वर्गातील महिला भाजपच्या मागे आहेत. उत्तर प्रदेशात तर महिला मतदारच भाजपचा विजयाचा मार्ग प्रशस्त करतात असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे नमूद केले आहे. मात्र राजकीय जाणकारांच्या मते मोदी-शहा राजकारणात कोणत्याच बाबतीत कोणताही धोका पत्करणारे नाहीत. त्यामुळे महिला राष्ट्रपती बनणे या एका घटनेने देशभरातील महिला वर्गाला मोठा सकारात्मक संदेश मिळू शकतो. काँग्रेसने २००९ च्या निवडणुकीत याचा ‘फॅक्टर’ चा लाभ घेतलेला आहे. लोकसभेतील ४७ जागांवर आदिवासी व अनुसूचित जातींचेच खासदार निवडून येतात. सध्या यातील तब्बल ३१ जागा भाजपच्या ताब्यात आहेत.

संख्येचे गणित

निवडून येण्यासाठी मुर्मू यांना आवश्यक ती मते ५,३९,४२०

भाजप आघाडीकडे सध्याचे मतांचे बळ ५,२६,४२०

बिजू जनता दलाची मुर्मू यांना मिळणारी मते ३१,०००

जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस कडील मतमुल्य ४३,०००

झारखंड मुक्ती मोर्चाला मुर्मू यांना मत द्यावे लागल्यास त्यांची मते २०,०००

(आम आदमी पक्ष, तेलुगू देशम, अकाली दल यासारख्या पक्षांची मते सध्या गृहीत धरलेली नाहीत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com