
पुणे : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत (Sugarcane Crushing Season) हंगाम सुरू झालेला असून, शेतकऱ्यांच्या शेतापासून ते साखर कारखान्यांपर्यंत उसाची वाहतूक (Sugarcane Transport) करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडीमालक व चालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ऊस वाहतुकीची ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाडी अशी वाहने इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी वेगाने प्रवास करीत असतात. प्रवास करताना किंवा उभे असताना दृश्यमान नसल्यास रस्त्याने प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ब्रेकिंग डिस्टन्स व स्टॉपिंग डिस्टन्स यांचा मेळ न बसल्यामुळे ट्रेलरला मागून धडक बसून अपघात होतात. हे टाळण्यासाठी वाहनमालक, चालकांनी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना करणे आवश्यक आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने या वाहनांना पुढे व मागे रिफ्लेक्टिंग टेप लावावी. एकापेक्षा जास्त ट्रेलर जोडून उसाची वाहतूक करू नये. वाहनांचा वेग योग्य मर्यादेत ठेवणे, मागील वाहने पाहण्यासाठी आरसे लावणे, मोठ्या आवाजामध्ये वाहनामध्ये म्युझिक सिस्टिम लावू नये, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये. वाहने रस्त्याच्या कडेला उभी करू नयेत. वाहनांच्या क्षमतेबाहेर (ट्रेलरच्या दोन्ही बाजूंच्या बाहेर) ऊस भरू नये. इतर वाहनांचा अंदाज घेऊन शेतातून मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर/ट्रेलर आणावे.
हे अपघात विशेषतः रात्रीच्या वेळेस घडत असतात. सध्या हिवाळा असल्याने धुक्यामुळे रात्रीची दृश्यमानताही कमी असते, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. यासाठी फ्लोरोसेंट रंगातील रिफ्लेक्टिव्ह पट्ट्या असलेले आच्छादन शेवटच्या ट्रेलरवर लावल्यास अपघातांना आळा बसू शकेल.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांच्या पालनाची जबाबदारी पालक, मालक यासोबतच माल भरणाऱ्या कारखान्यांची असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची नोंदणी, तसेच चालकाकडे विमा, वाहनपरवाना आदी विधिग्राह्य कागदपत्रे असल्याची खात्री संबंधित साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर खात्री करावी.
साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या ट्रेलर्सच्या वजनावरून ट्रेलरच्या अंतर्गत मोजमापानुसार ट्रेलरच्या क्षमतेपेक्षा जास्त माल होणार नाही अशाप्रकारे ऊस भरण्याची कमाल उंची निश्चित करून द्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूत्रांनी केले.
-----
कोट
सुरक्षित व विनाअपघात वाहतूक या बाबींकडे विशेष लक्ष देत साखर कारखान्यांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने वाहन चालकांचे व मालकांचे सुरक्षित वाहतूक विषयक समाजप्रबोधन करावे.
डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.